महाराष्ट्रात १६ इंजिनीयरिंग कॉलेजांमध्ये बोगस कोर्सेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्रातील १६ अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) महाविद्यालयांमध्ये बोगस अभ्यासक्रम चालत असल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी नुकतीच लोकसभेत दिली. देशभरातील २७७ शिक्षणसंस्थांमध्ये कोणत्याही मान्यतेशिवाय अभ्यासक्रम चालतात त्यात महाराष्ट्रातील या १६ महाविद्यालयांचा समावेश आहे. देशात सर्वाधिक बोगस अभ्यासक्रम राजधानी दिल्लीमधील संस्थांमध्ये चालतात अशीही माहिती देण्यात आली.

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी यासंदर्भातील कागदपत्रेही लोकसभेत सादर केली. तेलंगणात ३५, पश्चिम बंगाल २७, कर्नाटक २३, उत्तर प्रदेश २२, हरयाणा १८ तर तामीळनाडूत ११ शिक्षणसंस्थांमध्ये बोगस अभ्यासक्रम चालत असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थांमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय अभ्यासक्रम चालतात अशी माहिती त्यांनी दिली.

एआयसीटीईच्या संकेतस्थळावर या शिक्षणसंस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी या संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या संस्थांमध्ये गेले तेव्हा त्यांना त्या संस्थांनी प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाकडेही (यूजीसी) २४ बोगस विद्यापीठांची यादी असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले.

याच महाविद्यालयांमधील कोर्सेसच्या एआयसीटीईची परवानगी

– एकेआय महाविद्यालय, नागपाडा
– अंजुमन खैरूल इस्लाम्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट
– एडुवे अॅकॅडमी, बेलापूर
– एल्फिन्स्टन्स महाविद्यालय, फोर्ट
– हालो टेक्नॉलॉजीच्या मालाड, ठाणे, दादर, कल्याण येथील संस्था
– आयसीआयटी महाविद्यालय, गोरेगाव
– आयबीएसएआर, बेलापूर
– इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, पिंपळगाव-नाशिक
– मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मीरा रोड
– ओझर विकास संस्थेचे मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट
– एमआयएसबी बोक्कोनी, पवई
– फजलानी आल्टीअस बिझनेस स्कूल, अंधेरी
– इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, बेलापूर