
दिवाकर शेजवळ । मुंबई
एस.टी.च्या कुर्ला (पूर्व) नेहरू नगर येथील आगारामध्ये तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या नव्या डेपो मॅनेजरने क्षुल्लक कारणांवरूनही कर्मचाऱ्यांना नाना प्रकारे छळण्याचे सत्र अवलंबले आहे. मनमानीपणे जबर दंडाची वसुली, तडकाफडकी निलंबन, रजेनंतर डय़ुटीवर घेण्यास नकार, बडतर्फीच्या धमक्या अशा कारवायांमुळे डेपोमधील कर्मचारी हैराण झाले आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांच्या विरोधात सह्यांची मोहीम हाती घेऊन ‘चले जाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. कुर्ला एस.टी. डेपोत सुमारे चारशे कर्मचारी कार्यरत आहेत.
डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांनी चालवलेला अन्याय आणि छळामुळे वयाची ५८ वर्षे पूर्ण करून निवृत्त होईपर्यंत न थांबता ५५ व्या वर्षीच सेवानिवृत्ती पत्करण्याचा विचार अनेक त्रस्त कर्मचारी बोलून दाखवत आहेत.
खाडा केल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर दंड आकारण्याची पद्धत एस.टी. महामंडळात आहे, पण दंडाची रक्कम माफक असते. डेपो मॅनेजर बच्छाव यांनी मात्र खाडय़ाबद्दल सुमारे 3 हजार रुपयांचा दंड आकारण्यापर्यंत मजल मारली आहे. अपघातग्रस्त वा आजारी कर्मचाऱयांना रजेवरून परतल्यानंतर वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे जवळ असतानाही डेपो मॅनेजर त्या कर्मचाऱ्यांना डय़ुटीवर रुजू करून घेण्यास सर्रास नकार देतात. त्या कर्मचाऱयांना बरेच दिवस तिष्ठत बसवून गुलाब बच्छाव हे सतावणुकीचा विकृत आनंद लुटत आहेत.
– कंडक्टर ए. के. नलावडे यांना एक दिवसाच्या खाडय़ासाठी २ हजार ९३५ रुपयांचा दंड.
– वाहनचालक आर. जी. डेले यांनी पत्नीच्या आजारपणासाठी आठवडाभराची रजा घेतल्याबद्दल त्यांना दोन महिने कामावर घेतले नाही.
– कंडक्टर बी. जी. गोतुर्णे यांनी आठ-दहा दिवसांची रजा घेतल्याबद्दल त्यांना दोन महिने बेकायदा घरी बसवले.
– तीन एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये आपापसातील थट्टामस्करीवरून वाद झाला होता. त्यावरून वाहनचालक एस. एस. कांबळे, एन. आर. मांगले आणि कंडक्टर पी. डी. बांगे या तिघांना १५ दिवसांसाठी डेपो मॅनेजर गुलाब बच्छाव यांनी तडकाफडकी निलंबित केले होते.
केईएम रुग्णालयाची प्रमाणपत्रेही चालेनात
कुर्ला नेहरू नगर डेपोमध्ये विठ्ठल जयसिंग लोंढे हे २४ वर्षे सेवा केलेले ज्येष्ठ वाहनचालक आहेत. त्यांना ११ जून २०१८ रोजी दुपारी पनवेल-कुर्ला एस.टी.वर डय़ुटीवर असताना अपघात झाला होता. भरपावसात गाडीतून उतरताना पडल्यामुळे लोंढे यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यांच्या हाताला १८ दिवस प्लॅस्टर होते. १२ ते ३१ जूनपर्यंत त्यांनी केईएम रुग्णालयातून उपचार घेत विश्रांती घेतली होती, पण त्या रुग्णालयाची कागदपत्रे सादर करूनही बच्छाव यांनी त्याबद्दल नाहक शंका, संशय व्यक्त करत लोंढे यांना १ जुलैपासून डय़ुटीवर घेण्यास नकार दिला होता. अखेर त्यांना चार दिवस तिष्ठत बसवून बच्छाव यांनी डय़ुटीवर घेतले, पण त्यांची रजा नामंजूर करून टाकली.
कुर्ला ‘एसटी’ डेपोतील कोणी कर्मचारी सतावणुकीबद्दलची तक्रार घेऊन अद्यापि तरी आमच्याकडे आलेला नाही. पण आपण स्वतः त्या डेपोला भेट देऊन माहिती घेणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचा छळ होत असेल तर व्यवस्थापकीय संचालकांकडे दाद मागून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ.
– हिरेन रेडकर, सरचिटणीस,
महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना
पाच हजार रुपयांच्या दंडाची मागणी
विठ्ठल लोंढे हे १९ मे रोजी कल्याण-पनवेल गाडीवर महिला कंडक्टरसोबत डय़ुटीवर होते. त्यावेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एस.टी.ला उजव्या बाजूला एका कारचा किरकोळ धक्का लागला होता. मात्र कामधंद्याच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा करून गाडी पंचनाम्यासाठी पोलीस ठाण्यात नेणे रास्त नव्हते. शिवाय, कारमालकाने माफी मागत एस.टी.च्या दुरुस्तीसाठी ५०० रुपये आणि पुढील संपर्कासाठी त्याचा मोबाईल नंबर दिला होता, असे महिला कंडक्टर पूजा फोंडेकर यांनी सांगितले. या प्रकरणात पंचनामा का केला नाही, असा सवाल करत वाहनचालक लोंढे यांच्याकडे पाच हजार रुपये दंडाची मागणी डेपो मॅनेजर बच्छाव यांनी चालवली आहे. त्यावरून लोंढे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची धमकी देत २८ जुलैपासून डय़ुटी देणेही डेपो मॅनेजरने बंद केले आहे.


























































