
सामना ऑनलाईन । मुंबई
इतरांनी केलेल्या संशोधन प्रबंधातील बराचसा भाग चोरून स्वतःच्या नावावर खपवणार्या विद्यार्थ्यांची आता खैर नाही. संशोधन प्रबंधाचा ६० टक्के भाग पूर्वी प्रकाशित झालेल्या प्रबंधांमधून कॉपी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची नोंदणीच रद्द केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तसा कायदा बनवला असून तो २३ जुलैपासून अमलात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या प्राध्यापकांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यांची वार्षिक पगारवाढ रोखली जाणार आहे किंवा दोषी आढळल्यास त्यांची हकालपट्टीही होऊ शकेल. कॉपीचे प्रमाण १० ते ४० टक्के आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील सहा महिन्यांत सुधारित प्रबंध सादर करावा लागणार आहे.
प्राध्यापकाची ‘गाइडशिप’ धोक्यात
४० ते ६० टक्के प्रबंध कॉफी केल्याचे आढळले तर संबंधित विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापकावर गंडांतर येणार आहे. त्या प्राध्यापकाची वेतनवाढ रोखली जाणार असून त्याला त्यापुढे कोणत्याही नव्या एमफिल, पीएचडी विद्यार्थ्याचा गाइड बनता येणार नाही असे हा नवा कायदा सांगतो. हीच चूक प्राध्यापकाने तीन वेळा केली तर त्याला बडतर्फीला सामोरे जावे लागणार आहे.


























































