नागपूरमधील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत गडकरी यांनी घेतली बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले़ यानंतर महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासतर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे़ या कारवाईविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे़ मनपासह राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असून सरकार देवांना वाचविण्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोप होत असल्यामुळे सत्ताधारी भाजपाची चांगलीच गोची झाली आहे़ या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली.

देवाला रस्त्यावर आणून पदपथांवर बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या धार्मिकस्थळांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते़ अशाच प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाला दिले़ यानंतर नासुप्र, महापालिकेने कारवाई सुरू केली़  रस्त्यावर असणारी, वाहतुकीला अडसर ठरणारी धार्मिक स्थळे हटवित असताना नागरिकांनी आक्षेप घेतला नाही़ मात्र, आता कोणताही अडसर नसणारी, अंतर्गत वस्त्यांमध्ये असणारी, ले-आउटच्या पी यू लॅण्डवर (सार्वजनिक वापराच्या जागा) असणारी, नागरिकांनी निधी गोळा करून बांधलेली धार्मिक स्थळेदेखील पाडली जात आहे़ काही ठिकाणी मनपातर्फे बांधण्यात आलेल्या बुद्धविहारांनाही नोटीस देण्यात आल्या आहेत़ महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी स्थापन झालेली अनेक मंदिरे शहरात आहेत़ त्यांनाही प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत़ यामुळे समाजमन संतप्त झाले आहे़ नागरिक रस्त्यावर उतरत आहेत़ शहरात २००९ पूर्वीची १ हजार ५२१ व २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची मनपात नोंद आहे़ यातील १७ अतिप्राचीन स्थळांचा समावेश अ श्रेणीत असल्यामुळे त्यांना नियमित करण्यात आले़ मंगळवारी झोनमधील दोन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण करण्यात आले. तर १७५ धार्मिक स्थळे १ मे १९६० पूर्वीची आहेत.

समन्वयाने मार्ग काढा, आज बैठक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी नागपुरात आहेते़ सकाळी त्यांना धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी भेटले़ तर सायंकाळी गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी मनपातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली़ यात समन्वयाने मार्ग काढावा, नागरिकांना सोबत घेऊ न हा विषय हाताळावा असे सांगण्यात आले़. सोमवारी सायंकाळी ५ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात सर्वधर्मिय धार्मिक स्थळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

विकासकामांचाही घेतला आढावा
पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहे़ त्यामुळे सुरू असणारी विकासकामे तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे़ गडकरी यांनी विकासकामांचाही आढावा घेतला़ विकासकामे पूर्ण करावी, पदाधिकार्‍यांची याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

९ ऑगस्टला भाजपाची बैठक
येत्या ९ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे शहरातील पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवरातील संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे़ या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पदाधिकार्‍यांनी गडकरी यांना दिले असल्याची समजते.