
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्य सरकार तसेच महापालिकांशी संबंधित कार्यालयांत व्यवहार मराठीतूनच करावेत असे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, हे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम एका मराठी शाळेतूनच केले जात आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी (आयईएस) या शिक्षणसंस्थेत शिक्षकांशी इंग्रजीतून पत्रव्यवहार केला जात आहे. याला विरोध करणाऱ्या शिक्षकांनाच गैरवर्तणूक केल्याचा दम भरला जात असल्याची बाब समोर आली आहे.
इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मरोळ येथील मराठी शाळेत अस्मिता बने या विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अस्मिता बने यांनी आपल्या तसेच अन्य शिक्षकांवरील अन्यायाबाबत संस्थेसोबत पत्रव्यवहार केला. याबाबत शाळेकडून बने यांना करण्यात येत असलेला पत्रव्यवहार मात्र इंग्रजीत आहे. मराठी शाळा असूनही इथे होत असलेल्या इंग्रजी पत्रव्यवहाराला बने यांनी आक्षेप घेतला. शाळेकडून पाठवलेल्या इंग्रजी पत्राचा अर्थ आपल्याला कळलेला नाही. त्यामुळे पत्र स्वीकारत नसून मराठीत पत्रव्यवहार करावा अशी मागणी त्यांनी केली. यानंतरही शाळा प्रशासन वरमले नाही. मुख्याध्यापकांकडून उलट अस्मिता बने यांनाच पुन्हा इंग्रजीत पत्र लिहून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना इंग्रजी येणे बंधनकारक आहे. तुम्ही पत्र न स्वीकारून गैरवर्तन करीत असल्याचा दम बने यांना दिला जात आहे.
विश्वस्तांकडून मानसिक छळ
इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सतीश नायक यांच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका शिरकर यांच्या माध्यमातून आपली पत्नी अस्मिता बने यांचा मानसिक छळ सुरू असल्याची तक्रार उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नायक यांच्याकडून ‘नोकरीचे पत्र इंग्रजीतून घेतले जाते, मग हे पत्र इंग्रजीत असले तर काय’ असे बेधडक वक्तव्य शिक्षणाधिकारी पालकर यांच्याकडे केले जाते. हा मराठी भाषेचा अवमान नव्हे काय? नायक यांच्याकडून शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याची तक्रार राजन बने यांनी उपशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मराठी लेटरहेडवर मजकूर इंग्रजी
जेवढी पत्रे बने यांच्याकडून शाळेला पाठविली जात आहेत त्याला उत्तर देताना ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी; मराठी प्राथमिक शाळा, मरोळ’ अशा मराठी लेटरहेडवर इंग्रजी मजकुरात उत्तर दिले जात आहे. हे उत्तर नव्हेच, बने यांना गैरवर्तणूक केल्याची दमबाजी केली जात आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांचा रबरस्टॅम्पही मराठीत असताना मजकूर इंग्रजीत लिहिण्याचा अट्टहास का असा सवाल केला जात आहे.





























































