
सामना ऑनलाईन । जामनेर
मद्यधुंद चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळकरी मुलांना उडविल्याने अपघातात सहा लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. यातील तिघांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळकरी मुलांना मद्यधुंद असलेल्या चारचाकी चालकाने सहा विद्यार्थ्यांना चिरडले. यात कोमल रवींद्र बऱ्हाटे (१४), राजू बापू खरे (१५), निकीता भागवत बोरोले (१५), आशिष पोपट मोरे (१५), प्रतिभा रवींद्र मोरे (१४), पूजा आत्माराम पवार (१४) यातील एकाला मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर इतर गंभीर जखमी अवस्थेतील शाळकरी मुलांवर जळगाव येथील आर्कीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मद्यापी चालक श्यामकांत रामदास भंगाळे (रा. सुनसगाव) हा आपल्या एमएच १९ सीई ५७५८ महिंद्रा टीव्ही ३०० या गाडीने जळगावहून नेरीकडे चुकीच्या बाजूने येत असताना शाळेमध्ये जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या मुलांच्या दिशेने गाडी नेऊन त्या मुलांना चिरडले. तसेच आणखी एका प्रकाशालाही गाडीचा धक्का लागल्याने तोही जखमी झाला.
या अपघाताबाबत मद्यपी चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.
































































