
सामना प्रतिनिधी । नागपूर
सावनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संघमित्रा ढोके व विद्युत अभियंता आनंद खुणे यांनी कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटदाराने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी सांयकाळी मुख्याधिकारी ढोके यांच्याच दालनात घडला. या प्रकरणी ढोके यांनी सावनेर पोलीस ठाणे गाठून कंत्राटदार विजय बैसुले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
बसुले हे देयके काढण्यासाठी वारंवार कक्षात येऊन अरेरावी करतात. त्यांनी घटनेच्या दिवशी कार्यालयात येऊन माझ्यावर देयके काढण्यासाठी दबाव टाकला. दरम्यान, त्यांना शांत बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अभियंता खुणे आणि माझ्यावर आरडाओरड करून जीवे मारण्याची धमकी दिली. रजिस्टर व इतर दस्तऐवज फेकले. यावेळी कर्मचारी निशांत धुर्वे, विनायक पाठोडे, जयंत वानखेडे, निखिल वाझे हे माझ्या कक्षात उपस्थित होते, असे ढोके यांच्या तक्रारीत नमूद आहे. यापूर्वी कंत्राटदार बसुले यांनी असे प्रकार केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. या प्रकरणाची सावनेर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५०६ व १८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पुढील तपास पीएसआय ताडीकोटे करीत आहे.





























































