
सामना ऑनलाईन । चेन्नई
एम. करुणानिधी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर ‘द्रमुक’मध्ये त्यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण यावरून रण माजणार की त्यांनी अधिकृत वारसदार ठरवलेले एम. के. स्टॅलिन हेच पक्षावर हुकमत चालवणार हा प्रश्न आज द्रमुक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला आला.
करुणानिधी हे तब्बल ५० वर्षे द्रमुकचे सर्वेसर्वा होते, मात्र त्यांची दोन मुले एम. के. स्टॅलिन आणि एम. के. अलागिरी यांच्यातील विकोपाला गेलेला संघर्षही गाजला आहे. अलागिरी हे यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिल्यानंतर २०१४ सालात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. करुणानिधी यांनी एम. स्टॅलिन यांना राजकीय उत्तराधिकारी नियुक्त करण्याला अलागिरी यांचा विरोध होता. इतकेच नव्हे तर उत्तराधिकारी नेमायला द्रमुक पक्ष म्हणजे एखादा मठ आहे काय, असा सवाल करत त्यांनी वडिलांना म्हणजे करुणानिधी यांना ललकारले होते. मात्र २८ जुलै रोजी करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या दिवसापासून त्यांचे अवघे कुटुंब एकत्र आले होते. त्यामुळे आपापसातील वादांना मूठमाती मिळाल्यात जमा आहे असे एका ज्येष्ठ द्रमुक नेत्याने सांगितले.
एम. के. स्टॅलिन यांनी सर्वसमावेश धोरण ठेवून पुढे वाटचाल केली तर पक्षाला एकसंध राखण्यास ते कामी येईल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यांनी अलागिरी आणि सावत्र बहीण कनिमोझी यांनाही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत योग्य ते स्थान दिले पाहिजे असे विश्लेषकांना वाटते.
भाजप संघर्ष माजवेल
द्रमुकमध्ये करुणानिधी यांच्या पक्षात ‘कुटुंबकलह’ उफाळणार नाही असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटत असले तरी राजकीय निरीक्षकांची मते वेगळी आहेत. भाजप हा प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यास टपलेला आहे. जयललिता, करुणानिधी ही व्यक्तिमत्त्वे त्यांच्या पक्षांना एकसंध राखण्यात कामी येत होती, पण जयललिता यांच्यापाठी अण्णा द्रमुकच्या जशा चिरफाळय़ा उडाल्या तसे द्रमुकच्या बाबतीतही भाजप घडवेल असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. अलागिरी यांचे दक्षिण तामीळनाडूतील जिल्हय़ांवर वर्चस्व असून ते आता उचल खाऊ शकतात, असे विश्लेषक श्याम षन्मुगम यांचे मत आहे.
























































