हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद; रास्ता रोको, रक्तदान आणि जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शहरासह जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव ही तालुक्याची ठिकाणे आणि बाजारपेठेच्या प्रमुख गावांसह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळुन आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा देण्यात आला. आखाडा बाळापूर येथे रास्ता रोको दरम्यान रस्त्यावरच आंदोलकांनी रक्तदान शिबीर घेतले. तर सेनगाव येथे स्कुल बस आणि बोलेरो जीप जाळण्यात आली. काही गावात रास्ता रोको दरम्यान टायर जाळण्याच्या घटना घडल्या असुन पशुधनासह मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले. जिल्ह्यात शंभरच्यावर ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले.

हिंगोली –
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये हिंगोली शहराने सहभाग घेतला. जवाहर रोड, कपडा गल्ली, मोंढा, पलटन, रिसाला, अकोला बायपास, खटकाळी बायपास, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, पोस्ट ऑफीस रोड यासह शहरातील नगरे व उपनगरातील लहान-मोठी सर्व दुकाने, टपऱ्या, खासगी कार्यालय बंद ठेवण्यात आली होती. नांदेड नाका येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी रास्ता रोकोमध्ये सहभागी होऊन मराठा समाज बांधवांच्या मागणीला पाठींबा दर्शविला. शिवसेनेचे नगरसेवक प्रतिनिधी राम कदम, नगरसेवक नाना नायक यांच्यासह १७४ जणांनी मुंडण करुन सरकारचा निषेध नोंदवत तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली.

बळसोंड बायपास, जवळा-पळशी रोड, लालालजपतराय नगर कमान या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परभणी अशा सर्व दिशांनी जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. हिरो होंडा शोरुमजवळ तिरुपतीनगर, लाला लजपतरायनगरसह परिसरातील महिला भगिनी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. भजन, किर्तन, पोवाडे गात आरक्षणाची मागणी करण्यात आली. मराठा समाज बांधवांनी शहरातुन रॅली काढत ’एक मराठा लाख मराठा’, ’आरक्षण आमच्या हक्काचे…..’, ’हर हर महादेव’, ’जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. शहरात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तसेच हिंगोली तालुक्यातील राहोली, सवड, माळधामणी, डिग्रस कऱ्हाळे, नर्सी नामदेव, कनेरगाव नाका यासह विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. राहोली फाटा येथे मुंडण आणि रस्त्यावर टायर जाळण्यात आले. डिग्रस कऱ्हाळे येथे रस्त्यावर टायर जाळुन निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, राहोली येथे आंदोलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देत माणुसकीचा संदेश दिला. हिंगोलीत व तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या आंदोलनात व बंदमध्ये सहभागी झाले. शहरामध्ये काही वकीलांनी देखील मुंडण करुन निषेध व्यक्त केला.

वसमत –
शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीला व्यापारी महासंघाने पाठींबा देऊन बाजारपेठ बंद ठेवली. शहरातील सर्वच दुकाने व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, हयातनगर फाटा, टाकळगावसह विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करुन बंद पाळण्यात आला. वसमत-नांदेड-संभाजीनगर रस्त्यावर जिंतुर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. तसेच अन्नदान देखील काही ठिकाणी करण्यात आले आहे.

कळमनुरी-
शहरासह तालुक्यात बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षण व ईतर मागण्यांना पाठींबा देण्यात आला. कळमनुरीतुन जाणाऱ्या नांदेड ते हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच तालुक्यातील विविध गावामध्ये देखील रास्ता रोको आंदोलन व बंद मध्ये सहभाग घेण्यात आला. कामठा फाटा येथे रास्ता रोको आंदोलनादरम्यान अन्नदान करण्यात आले.

सेनगाव –
शहरासह तालुक्यात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सेनगावमध्ये एक स्कुलबस जाळल्याची घटना सकाळीच घडली. तसेच दुपारी एक ते दीडच्या दरम्यान बोलेरो जीप जाळण्यात आली. सेनगाव तालुक्यातील आजेगाव, सवना, पानकनेरगाव, पुसेगाव पाटी येथे देखील रास्ता रोको करण्यात आले जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आंदोलन सुरु असतांना सेनगावात मात्र जाळपोळीच्या दोन घटना घडल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

औंढा नागनाथ –
शहरासह तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवुन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यात आला. औंढ्याच्या बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच रस्त्यावर टायर जाळन्यात आले. औंढा तालुक्यातील बोरजा फाटा येथे पशुधनासह मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले होते. बैलगाडी व वृक्ष लावुन रास्ता रोको करण्यात आला. तसेच काही ठिकाणी टायरही जाळण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर, हिवरा फाटा, पिंपळदरी, वगरवाडी, लाख फाटा, येहळेगाव सो. यासह विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आखाडा बाळापूर –
येथील बाजारपेठ आज कडकडीत बंद ठेवुन नांदेड-हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी शेवाळा चौक येथे रस्त्यावरच रक्तदान शिबीर घेतले. दुपारी दिड वाजेपर्यंत २० रक्तदात्यांनी शिबीरामध्ये सहभाग घेतला. बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडासह विविध ठिकाणची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

जवळाबाजार-
येथील बाजारपेठ आज पूर्णत: बंद ठेवण्यात आली. सर्व लहान-मोठी दुकाने सकाळपासुनच बंद होती. परभणी-हिंगोली रस्त्यावर जवळाबाजार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच जवळाबाजार येथील काही डॉक्टरांनी मुंडण करुन सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले.

हट्टा –
वसमत तालुक्यातील हट्टा येथे भजन, किर्तन करत गावातुन सकल मराठा समाजातर्फे वाजत-गाजत फेरी काढण्यात आली. तसेच हट्टा येथे परभणी-हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हट्टा येथील बाजारपेठ व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत आरक्षणाची मागणी करण्यात आली. तसेच चिखली रोड येथे मुंडण आंदोलन व रास्ता रोको करुन निषेध व्यक्त करण्यात आला. काही आंदोलनकांनी रस्त्यावर टायर जाळुन सरकारचा निषेध नोंदविला. वसमत तालुक्यातील चिखली रोडवर मुंडण आंदोलन करुन बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला.

गोरेगाव-
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे बाजारपेठ बंद ठेवुन रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तसेच गोरेगाव परिसरातील केंद्रा बु., ताकतोडा, कहाकर, महजोड, कडोळी, भगवती, सुरजखेडा येथे देखील बंद पाळुन रास्ता रोको करण्यात आले.

तगडा पोलीस बंदोबस्त
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या हिंगोली जिल्हा बंदच्या पार्श्वभुमीवर शहरासह जिल्हाभरात पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ठिकठिकाणी पोलीस तसेच होमगार्डचे जवान बंदोबस्तात सक्रिय सहभागी झाले. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, एसआरपी, दंगाकाबु पथक, शिघ्र प्रतिसाद पथक यांची देखरेख होती.

एसटी बंद, रेल्वे रद्द
हिंगोली शहरासह जिल्ह्यात आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस रस्त्यावरुन धावली नाही. तसेच अन्य खासगी चार चाकी वाहनेही रस्त्यावरुन धावली नाहीत. ठिकठिकाणच्या रास्ता रोको व बंद आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर एसटीची एकही बस हिंगोली, कळमनुरी व वसमत आगारातुन सोडण्यात आली नाही. दरम्यान, पूर्णा-हिंगोली-अकोला या मार्गावरुन धावणाऱ्या गाडी क्रमांक १२७६६ अमरावती-तिरुपती एक्सप्रेस या रेल्वेगाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्यामुळे नांदेड ते चुडावा दरम्यान ही रेल्वे एक तास थांबविण्यात आली. तसेच परळी ते अकोला, अकोला ते पूर्णा या हिंगोली मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या रद्द केल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविले आहे.

सर्वत्र शांतता, सामसुम
काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळण्याच्या आणि सेनगाव येथे एक स्कुल बस व एक बोलेरो जीप जाळण्याच्या घटनांचा अपवाद वगळता हिंगोली शहरासह जिल्हाभरात बंद व रास्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलना दरम्यान मराठा समाज बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.