शेतकऱ्याने परत केले दहा हजार रुपये, प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, चाकूर

पिकविमा रकमेत अधिकचे आलेले दहा हजार रुपये बँकेकडे परत करून एका शेतकऱ्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने या शेतकऱ्याचे व त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुक्रवार १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास चाकूर तालुक्यातील सांडोळ येथील शेतकरी व्यंकटी शिळे हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पिकविमा आलेली रक्कम घेण्यासाठी आले होते. ७० हजार ४०० रुपयांची मागणी त्यांनी रीतसर बँकेच्या स्लीपद्वारे केली होती. परंतु कॅशिअरच्या अनावधानाने ७० हजार ४०० ऐवजी ८० हजार ४०० रुपये शिळे यांना दिले गेले. कोणताही शेतकरी हा शक्यतो कोणतीही रक्कम मोजून पाहतो. कारण ही रक्कम त्यांनी केलेल्या काबाडकष्ट व घामाची असते. म्हणून शिळे यांनी मिळालेली रक्कम बँकेच्या आवारात बसून मोजली.

रक्कम मोजल्यानंतर त्यांना दहा हजार रुपये अधिक आल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता शिळे यांनी माझी स्लीप किती रुपयाची आहे हो साहेब? अशी कॅशिअरकडे विचारणा केली. कॅशिअरने स्लीप तपासली असता सदरील स्लीप ७० हजार ४०० रुपयाची असल्याचे सांगितले. लगेचच शिळे यांनी आपल्याकडील असलेल्या पिशवीतून दहा हजार रुपयांचे बंडल कॅशिअरकडे देऊन आपणास रक्कम अधिकची आली असल्याचे सांगितले.

यावेळी बँकेच्या कॅशिअरच्या खिडकीजवळ अनेक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते. येथे उपस्थित असलेले चाकूर व शेळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख हरिश्चंद्र घटकार, प्रा.एस.एस.सय्यद यांच्यासह उपस्थित नागरिकांनी त्यांचे व त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.