नेहरू गाय आणि डुकराचं मांस खायचे, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gyan-dev-ahuja-bjp-mla

सामना ऑनलाईन । जयपूर

पहलू खान प्रकरणात आपल्या वादग्रस्त विधानाने टीका झालेल्या भाजपच्या आमदाराने पुन्हा एकदा असाच वाद ओढवून घेतला आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरू गाय आणि डुकराचं मांस खाणारे होते, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केलं आहे.

आहुजा हे राजस्थान येथील रामगढ विधानसभेचे आमदार आहेत. आहुजा यांनी नेहरू यांना पंडित ही उपाधी दिल्याचा निषेध करताना हे वक्तव्य केलं. नेहरू पंडित नव्हते, कारण ते गाय आणि डुकराचं मांस खात होते. गाय हिंदुंसाठी पवित्र आहे तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध आहे. त्यामुळे नेहरू पंडित नव्हते, असं अजब तर्कट आहुजा यांनी लावलं आहे.

यापूर्वीही दोन वेळा आहुजा यांनी अशा प्रकारे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. पहलू खान प्रकरणात गोतस्करी आणि सामूहिक हिंसेवरही त्यांनी असंच विधान केलं होतं. पहलू खान याच्या हत्येचं समर्थन करताना जो गोतस्करी करेल, तो मरेल, असं विधान केलं होतं. त्याआधी त्यांनी जेएनयूला सेक्स रॅकेटचा अड्डा म्हणताना देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांसाठी नेहरु कुटुंबच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.