
>> विवेक दिगंबर वैद्य
प्रसिद्धीपासून दूर तरीही संत मांदियाळीतील आपले वैशिष्टय़ जपणाऱया श्रीगोपाळदास महंतांचा परिचय करून देणारा लेख.
नाशिक शहर पुण्यभूमी, पवित्र तीर्थ म्हणून सुप्रसिद्ध आहे. इथला गोदावरीचा काठ जणू ‘मोक्षाचे प्रवेशद्वार’. श्रीरामरायाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक परिसराला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक वारसा लाभला आहे. श्रीदेव मामलेदार, श्रीमाधवनाथ, श्रीबीडकर महाराज, श्रीगजानन महाराज गुप्ते, श्रीरघुनाथ भटजी, श्रीनिरंजन रघुनाथ या व अशा अनेक सत्पुरुषांचा सहवास नाशिक भूमीस लाभला. श्रीगजानन महाराज (शेगाव) यांचेदेखील नाशिक परिसरात येणे-जाणे असे. काळाराम मंदिरात वास्तव्यास असलेले श्रीगोपाळदास महंत यांना भेटण्याकरिता श्रीगजानन महाराज नाशिकला येत असत.
श्रीगोपाळदास महंत कुठे जन्मले, कुठून आले याविषयी कुणासही काही ठाऊक नाही. गोदेच्या काठी भाटे यांच्या धर्मशाळेमागील परिसर दलदल आणि गच्च झाडीने व्यापलेला होता. तिथे सदासर्वकाळ चिखलात पडलेला, वेडसर भासणारा तरुण व त्याच्या आजूबाजूस असलेली नाग-सापांची वेटोळी पाहणाऱयाला भयचकित करून सोडत असे. सदोदित देहभान हरपलेली, अस्ताव्यस्त दाढी-मिश्या आणि डोक्यावर केसांचे जंगल अशा स्वरूपातली ही व्यक्ती म्हणजेच श्रीगोपाळदास महंत तथा श्रीनरसिंग किंवा श्रीनरसिंह महाराज.
श्रीगोपाळदास कुणाकडे काही मागत नसत, कुणाकडचे काही खात नसत. अहोरात्र चिखलात लोळणे हेच काय ते ध्येय असावे अशी त्यांची दिनचर्या होती. त्यांच्यातील देवत्व जाणलेली काही सहृदय मंडळी त्यांना चिखलातून बाहेर आणत. गोदेच्या पाण्याने स्वच्छ धुऊन काढत आणि जेवू-खाऊ घालीत. मात्र सच्चिदानंदी निमग्न झालेला हा अवलिया पुनः पुन्हा त्या दलदलीत जाऊन पडत असे. सातत्याने काही दिवसांनी पुनः पुन्हा घडणारा हा प्रसंग पंचवटीकरांसाठी आता काही नव्या अपूर्वाईचा राहिला नव्हता.
एके दिवशी परिसरातील नांदगावकर, दत्तोपंत चाफेकर आणि अन्य मंडळींनी निश्चय केला. त्यांनी श्रीगोपाळदासांना चिखलातून बाहेर काढले आणि गोदावरीच्या काठावर बसवून न्हाऊ घातले. न्हाव्यास बोलावून श्रीगोपाळदासांच्या डोक्याचे व दाढीचे केस कापले आणि त्यांस तेथून दूरवर असलेल्या काळाराम मंदिराच्या ओसरीवर आणून उभे केले. काळाराम मंदिरासमोर प्रवेशद्वाराशेजारील ओसरीवर पुढे जवळपास दीड वर्ष श्रीगोपाळदास उभ्या अवस्थेतच राहिले. कुण्या भाविकाने अन्नपाणी दिल्यास ते स्वीकारत नसत. बळेच भरविण्याचा प्रयत्न केला तर कधी दोन-चार शिते भक्षण करीत अन्यथा थुंकून टाकत. त्यानंतर श्रीगोपाळदासांनी त्या ओसरीतच बैठक मारली आणि शेजारी धुनी प्रज्वलित केली. त्यांच्या मुखात नेहमी ‘नरसिंह नरसिंह’ हे शब्द असत त्यामुळे काही मंडळी त्यांचा उल्लेख नरसिंह महाराज असा करीत तर काही भक्त मंडळी त्यांस श्रीगोपाळदास महंत असेही म्हणत असत.
काळाराम मंदिरात गोपाळदासांनी बैठक ठोकली ती देहत्याग करीपर्यंत. गोपाळदास कायम मौन राखून असत. मात्र काही सांगावयाचे असल्यास खुणेने हावभाव करीत. त्यांची सांकेतिक भाषा काही ठरावीक भक्त मंडळींनाच कळत असे. गोपाळदासांचे इष्ट दैवत श्रीनृसिंह होते. त्यामुळे ते जिथे बसत तेथील खांबामध्ये त्यांनी श्रीनृसिंहदेवतेचे स्थान निश्चित केले होते. त्या खांबास ते कोणालाही स्पर्श करू देत नसत तसेच तिथे बसूही देत नसत. गोपाळदासांना गांजाची चिलीम ओढण्याची सवय होती. मात्र त्यांचे हे वागणे केवळ वरवरचे होते. संतसत्पुरुषांचे वागणे त्यांच्यापुरते सुसंगत असले तरी बाह्यतः विसंगत असते. त्यामागे स्वतःचे मूळ स्वरूप लपविण्याची धडपड असते. याकरिता असंबद्ध वर्तन, व्यसनाधीन असणे, गाली प्रदान करणे, मारहाण करणे यांसारख्या गोष्टी ते करीत राहतात. भक्तांची अनावश्यक गर्दी आणि अनाठायी मिळणारी उपाधी टाळण्यासाठी त्यांनी घेतलेले हे बेगडी रूप असते.
श्रीगोपाळदासांचे वागणे, बोलणे विक्षिप्तपणाचे भासत असले तरी ते ‘परब्रह्मस्वरूप’ आहेत हे काही लोकांनी जाणले होते. तात्यासाहेब वानवळे, कर्डिले, मामलेदार, दत्तोपंत चाफेकर, महादेव वैद्य, वासुदेव थत्ते, नांदगावकर आदींनी श्रीगोपाळदासांचे मूळ स्वरूप ओळखले होते. इंदूरचे श्रीमाधवनाथ महाराज या नाथ परंपरेतील महान संतश्रेष्ठाने श्रीगोपाळदास यांच्या परमेशरूपावर जणू शिक्कामोर्तब केले होते. त्यांना श्रीगोपाळदास यांचे सांकेतिक भाषेतील गूढ शब्द, हातवारे, अंगविक्षेप व्यवस्थित समजून येत असत.
पुढे कालांतराने सदैव मौनात दंग असलेले गोपाळदास काही निवडक भक्तांशी कारणपरत्वे संवादही साधू लागले. वेदांत व धर्म या विषयांवर ते अभ्यासपूर्ण बोलत तेव्हा ऐकणाऱयांची मती गुंग होत असे. या अवलियाचे वेदांतभाष्य प्रकांड पंडितालाही लाजवणारे होते.
गोपाळदासांच्या हातून अनेक लीलाप्रसंग घडले. त्यांच्या अलौकिकत्वाचा परिचय अनेकांना अनेकदा झाला. एक पोलीस कॉन्स्टेबल दर्शनार्थ आला असता गोपाळदासांनी त्याच्या खिशात हात घातला अन् साठ रुपयांच्या नोटा बाहेर काढून जवळच्या धुनीमध्ये टाकल्या. नोटा भस्मसात होताच गोपाळदास म्हणाले, ‘‘इनके सौ पट देना लगता है’’ आणि त्यांनी कॉन्स्टेबलच्या पाठीवर तीन जोरदार रट्टे लावले. पुढे आठ दिवसांतच कॉन्स्टेबलला लॉटरीमध्ये सहा हजार रुपये मिळाले. गोपाळदासांच्या बाबतीत अशा अनेक अतर्क्य घटना घडल्या.
एकदा वासुदेवराव थत्ते आणि त्यांच्या पत्नीस गोपाळदासांनी स्वतःमध्येच प्रभू रामचंद्राचे साक्षात दर्शन घडवले होते. गोपाळदास यांचे बोलणे असंबद्ध वाटत असले तरी ते विद्वानांशी शास्त्र-पुराणे, वेदविद्या यांवर चर्चा करीत तेव्हा लौकिकार्थाने ते किती ज्ञानी आहेत हे जाणवत असे. गोपाळदास यांना कुणी शिष्य आणि शिष्यपरिवार नव्हता. मात्र त्यांच्या सेवेसाठी सूरदास नावाचा गृहस्थ येत असे.
गोपाळदासांना प्राणिमात्रांविषयी विशेष प्रेम होते. त्यांच्या आजूबाजूला कायम कुत्रे, गाई, पोपट आदी प्राणी-पक्षी असत. या सर्वांना सभोवती गोळा करून बसणे आणि खाऊ घालणे हा गोपाळदासांचा मनस्वी छंद होता.
श्रीगजानन महाराज (शेगाव) आणि श्रीमाधवनाथ (इंदूर) हे ज्यांचे प्रिय गुरुबंधू होते अशा या उच्च कोटीतील सिद्ध सत्पुरुषाने माघ वद्य ९, शके १८४१ अर्थात सन १९१९ मध्ये देह विसर्जित केला. श्रीदेव मामलेदार यांच्या समाधीसमोर गोदावरीच्या काठावर बांधलेल्या मंदिरात गोपाळदासांचा समाधिस्थ देह ठेवण्यात आला तेव्हा खुद्द श्रीमाधवनाथ महाराज तिथे उपस्थित होते. नाशिक येथे जाणाऱया प्रत्येक भाविकाने या मनस्वी सत्पुरुषाच्या समाधीचे दर्शन घ्यावे आणि काळाराम मंदिरातील त्यांच्या वास्तव्य धुनीस भेट द्यावी.





























































