
सामना प्रतिनीधी । मुंबई
मद्यपान केल्यानंतर झोपेच्या तंद्रीत असताना खिडकीजवळ गेला असता अचानक तोल जाऊन उघडय़ा खिडकीतून तो थेट खाली पडला. सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे तेजस दुबे (३२) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. तेजस हा आयटी प्रोफेशनल होता. सांताक्रुझ येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
गुरुवारी तेजस बेळगाववरून मुंबईत परतला होता. सांताक्रुझ येथील सी. के. आर्च इमारतीच्या सहाव्या मजल्यावर तो राहत होता. त्याच्या फ्लॅटची खिडकी फ्रेंच प्रकारची असून तिला ग्रिल नाही. त्यामुळे खिडकी उघडी होती. त्यात तो रात्री दारू प्यायलाने त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. मद्यपान त्यात झोपेची तंद्री यामुळे तो नीट उभा देखील राहू शकत नव्हता. अशातच तो खिडकीजवळ गेला आणि त्याचा तोल गेला. त्यामुळे तो सहाव्या मजल्यावरून खाली पडला. यातच तेजसचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.






























































