म्हाडाच्या घरांची लॉटरी दिवाळीत, यंदा एक हजाराहून अधिक घरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सिडको आणि म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीनंतर आता बहुप्रतिक्षित म्हाडाच्या मुंबई मंडळाची या वर्षीच्या घरांची लॉटरी दिवाळीमध्ये काढण्याची चिन्हे आहेत. मुंबईत शीवपासून कांदिवलीपर्यंत म्हाडाच्या सुमारे 1008 घरांच्या लॉटरीची जाहिरात काही दिवसांत वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होईल. मागील वर्षी म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकही घर नसल्याने म्हाडावर टीका झाली होती, पण यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी किमान 750 घरे राखून ठेवण्यात येणार आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसाधारणपणे मे महिन्यात काढण्यात येते, मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 819 घरांची लॉटरी काढली होती. या वर्षीच्या लॉटरीलाही विलंब झाला आहे. यंदाच्या लॉटरीसाठी एक हजारांहून अधिक घरे तयार आहेत. सध्या कोकण मंडळाच्या 9 हजार 10 घरांची लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे. 25 ऑगस्टला कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येईल. त्यानंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांनी मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होईल. पुढे सुमारे दीड महिन्याच्या अवधीनंतर मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येईल. मुंबई मंडळाची लॉटरी दरवर्षी वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येते, मात्र या वर्षी ही परंपरा खंडित करून म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात घरांची लॉटरी काढण्यात येईल.

सर्वाधिक मागणी अत्यल्प उत्पन्न गटाला
म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटातील घरांना सर्वात जास्त मागणी असते, मात्र गेल्या वर्षी एकही घर राखून ठेवले नव्हते. त्यामुळे म्हाडावर टीका झाली होती, पण म्हाडाने यंदा ही कसर भरून टाकली आहे.

मुंबई मंडळातील काही घरांची संख्या
पीएमजीपी कॉलनी-मानखुर्द अत्यल्प उत्पन्न गट – 114 घरे
गवाणपाडा, मुलुंड अत्यल्प उत्पन्न गट – 269 घरे
कन्नमवार नगर विक्रोळी मध्यम उत्पन्न गट – 28 घरे
अॅण्टॉप हिल वडाळा अत्यल्प उत्पन्न गट – 278
प्रतीक्षानगर-शीव अत्यल्प उत्पन्न गट – 86
घर दुरुस्ती मंडळाकडून मिळणार घरे अत्यल्प उत्पन्न गट – 5
सिद्धार्थ नगर-गोरेगाव अत्यल्प उत्पन्न गट – 24
महावीर नगर-कांदिवली – मध्यम उत्पन्न गट- 172
प्रतीक्षानगर उच्च उत्पन्न गट – 2
टागोरनगर-विक्रोळी अत्यल्प उत्पन्न गट – 7

घरांच्या किमती वाढण्याची शक्यता
म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा म्हाडाच्या घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.