हृदयाच्या देव्हाऱ्यात बसणारा माझा पहिला देव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

अजित वाडेकर या जगात नाहीत या गोष्टीवर मी विश्वासही ठेवू शकत नाही. लहानपणापासून आजतागायत ज्या ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं त्यात एक अजित वाडेकर होता. माझ्या हृदयाच्या देव्हाऱयात अनेक क्रिकेटपटूंना मी जागा दिलेली आहे, पण त्या देव्हाऱ्यात बसणारा माझा पहिला देव होता अजित वाडेकर. आणि त्याचं ते अढळ स्थान शेवटपर्यंत राहील.

तो ज्या वेळेला फलंदाजीसाठी बाहेर पडायचा तो त्याचा रुबाब पाहण्यासारखा होता. त्याची ती चाल, त्याचं ते डुलतडुलत क्रिझवर जाणं, मग पवित्रा घेणं आणि नंतर त्याची सौंदर्याने ओथंबलेली डावखुरी फलंदाजी. या सगळय़ा गोष्टी मी आयुष्याच्या अंतापर्यंत विसरू शकत नाही. त्याचा स्क्वेअर कट आणि त्याचा कव्हरड्राइव्ह इतका सुंदर होता की, प्रतिस्पर्धी कर्णधाराने अख्खं खानदान जरी आणून कव्हर्सला उभं केलं असतं तरीही त्याने चेंडू कव्हर पॉइंटला मारला असता. डावखुरे फलंदाज हे उपजतच शैलीदार असतात. देवाने अजित वाडेकरच्या फलंदाजीला एक वेगळंच सौंदर्य दिलं होतं. त्याचे फटके हे एखाद्या खळाळत जाणाऱया झऱयासारखे वाहायचे. चेंडूलाही सीमारेषेपर्यंत जाईपर्यंत गुदगुल्या होत असाव्यात. अत्यंत आळसावलेला वाटणारा हा फलंदाज ज्या वेळेला त्याचे सर्व फटके खेळून शतक ठोकायचा तेव्हा पाहणाऱयांचा आळस इतका पळून जायचा की, रात्री त्याच्या स्वप्नात अजित वाडेकरचेच फटके यायचे.

त्याचं हिंदुस्थानी क्रिकेटला असलेले योगदान प्रचंड मोठं होतं. वयाच्या 26व्या वर्षी तो प्रथम कसोटी सामना खेळला. त्यानंतर आम्हाला असं नेहमी वाटतं, किमान पाच वर्षे आधी जर तो खेळला असता तर त्याने कसोटीत केलेल्या धावांचं एक वेगळंच चित्र दिसलं असतं. 1971 साली तो हिंदुस्थानी संघाचा पहिल्यांदा कर्णधार झाला आणि मग पुढच्या सात महिन्यांत बलाढय़ वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीजमध्ये आणि इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवलं. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं किती कठीण गोष्ट आहे ते आपण सध्या पाहतोच आहोत. दोन्ही देशांत प्रतिस्पर्ध्यांना हरवणारा हिंदुस्थानी संघाचा तो पहिलाच कर्णधार.
त्याने सर्वात प्रथम हिंदुस्थानी क्रिकेट जागतिक नकाशावर आणलं. तोपर्यंत हिंदुस्थानी क्रिकेटला जगामध्ये फारशी किंमत नव्हती. हिंदुस्थानची क्लोज इन फिल्डिंग अजित वाडेकरच्या काळात जगात सर्वश्रेष्ठ होती. सोलकर, वेकंटराघवन, अबिद अली आणि स्वतŠ अजित वाडेकर यांनी आश्चर्यकारक झेल घेतलेले आहेत. त्यामुळेच चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना व वेंकट यांना प्रचंड यश लाभलं. वाडेकर स्लिपमध्ये एवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करायचा की, एकदा त्याने विकेटकीपरच्या पायातून गेलेल्या चेंडूचा झेल घेतला होता.

वाडेकरच्या हाताला परीसस्पर्श होता. पुढे त्याने प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली आणि हिंदुस्थानी संघ जिंकायला लागला. अजितच्या जाण्याने हिंदुस्थानी क्रिकेटमधला अत्यंत यशस्वी अशा कालखंडाचा निर्माता आज पडद्याआड गेलाय.