
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक एप्रिल-मेऐवजी त्याआधी डिसेंबरमध्ये घेतली तर त्यासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांची निवडणूक घेता येऊ शकते, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी आज सांगितले.
डिसेंबरमध्ये लोकसभेसोबतच चार राज्यांची निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे काय, असा सवाल मुख्य निवडणूक आयुक्तांना करण्यात आला होता. त्यावर का नाही घेऊ शकणार तशी एकत्र निवडणूक? त्यात काहीच अडचण नाही, असे उत्तर रावत यांनी दिले.
मिझोरामच्या विधानसभेचा कार्यकाल 15 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. तर छत्तीसगडच्या विधानसभेचा 5 जानेवारी 2019, मध्य प्रदेशचा 7 जानेवारी 2019 आणि राजस्थानचा 20 जानेवारी 2019 रोजी संपणार आहे. त्यामुळे एकत्रित निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतल्या जातील, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.
मतदानाची पोचपावती देणाऱया 17 लाख 50 हजार व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीटी) मशीनपैकी 16 लाख मशीन नोव्हेंबरआधीच निवडणूक आयोगाच्या हाती येतील. उरलेली 1 लाख 50 हजार मशीन नोव्हेंबरअखेरपर्यंत निवडणूक आयोगाला मिळणार आहेत.
एकत्रित निवडणुकांसाठी विधी आयोग ‘मार्ग’ खुला करणार
एकत्रित निवडणुकांना पाठिंबा आहे किंवा नाही, असे विधी आयोगाला सरकारने विचारलेले नाही. आम्हाला त्यासाठी ‘मार्ग’ शोधायला सांगितले आहे. त्यासाठी आम्ही झटत आहोत, असे विधी आयोगातील सूत्रांनी आज सांगितले. विधी आयोग हा एकत्रित निवडणुकांसाठी राज्यघटनेत आणि रिप्रेझेण्टेशन ऑफ द पीपल ऍक्टमध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस सरकारला करेल. आयोगाची शिफारस सरकारला बंधनकारक नाही. पण आमच्या अहवालामुळे राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू होईल, असे विधी आयोगाचे म्हणणे आहे. एकत्रित निवडणुकांचा पहिला टप्पा 2019 तर दुसरा टप्पा 2024 मध्ये पार पाडावा, असे सरकारला सुचवण्यात आले आहे.


























































