
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोसळणारे स्लॅब आणि समाजकंटकांच्या उपद्रवामुळे दहिसर पश्चिममधील स्कायवॉक धोकादायक बनले आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दहिसरमधील सर्व स्कायवॉकचे ऑडिट करून दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेने आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.
दहिसरमध्ये दीड वर्षापूर्वी स्कायवॉकचा स्लॅब कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. शिवाय या स्कायवॉकवर संमाजकंटकांकडून मद्यपान, अमली पदार्थाचे सेवन केले जाते. या समाजकंटकांचा ये-जा करणार्या रहिवाशांचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे शिवसेना आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या वतीने आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा समन्वयक किशोर म्हात्रे, शाखाप्रमुख संदीप राऊत हे उपस्थित होते.































































