
सामना प्रतिनिधी । पुणे
कॉसमॉस बँकेवर 94 कोटींचा ऑनलाइन दरोडा टाकून खळबळ उडवून दिल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. यामध्ये पोलिसांसह हैदराबाद, मुंबईतील सायबरतज्ञांचा समावेश आहे.
कॉसमॉस बँकेचे सर्क्हर हॅक करून स्मार्ट चोरटय़ांनी शेकडो बँक खात्यांतून पैसे काढल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून केला जात आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे. या पथकात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, राधिका फडके, सहा पोलीस कर्मचारी आणि सायबर गुन्हेतज्ञांचा समाकेश असणार आहे. हॅकरने कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 2 तास 13 मिनिटांमध्ये तब्बल 28 देशांतून पैसे काढण्यात आले आहेत. ही रक्कम हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली आहे.
हॅकिंगमध्ये कोल्हापूर कनेक्शन
हॅकरने मुंबईतून काही ठिकाणांवरून पैसे काढले आहेत. याचप्रमाणे कोल्हापूर येथूनही पैसे काढल्याची माहिती सायबर शाखेला मिळाली आहे. याच्या तपासासाठी सायबर शाखेचे एक पथक कोल्हापूरला गेले आहे.
कॉसमॉस बँकेच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग या याच्या प्रमुख आहेत. यात तीन पोलीस निरीक्षक आणि हैदराबाद, मुंबई येथील सायबर फॉरेन्सिक एक्स्पर्ट असणार आहेत. यातील कोल्हापूर कनेक्शनचा तपास सुरू असून तो आव्हानात्मक आहे.
n डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त



























































