धरती रडली, मेघही रडला! साश्रू नयनांनी अटलजींना अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आज दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेताला अनंतात विलीन होताना बघून देशवासियांना अश्रू अनावर झाले. यावेळी वाजपेयींना सलामी द्यायला मेघराज्याने देखील हजेरी लावली. वाजपेयींना मुखाग्नी देण्याच्या काही मिनिटे आधी पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना उभी राहिली ती म्हणजे ‘धरती रडली, मेघही रडला!’

अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच देश विदेशातील नेते दिल्लीत हजर झाले. काल रात्री पासून वाजपेयींचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज सकाळी देशविदेशातील नेत्यांनी वाजपेयींचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर अटलजींचे पार्थिव दुपारी एक वाजता भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर भाजप मुख्यालयातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेलाही हजारो नागरिक उपस्थित होते. चारच्या सुमारास अटलजींचे पार्थिव राष्ट्रीय स्मृती स्थळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तिन्ही दलाचे प्रमुखां व देश विदेशतील नेत्यांकडून त्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात तोफांची सलामी देत अटलजींच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.