अद्भूत रहस्यांनी भरलेले महान संत ‘परमहंस रामकृष्ण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Aniket songire
Assistant Professor, Bhonsala Military College, Nashik

>> अनिकेत सोनगिरे

“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।”- संत तुकाराम

भारतीय संस्कृतीत शब्दप्रमाण हेच अंतिम नसून अनुभवाला प्रचंड महत्व आहे.ज्ञानाच्या पायात अनुभव नसेल तर त्याला आपल्या संस्कृतीत स्थान नाही,म्हणून इथे जन्माला आलेल्या तत्वज्ञानाला ‘दर्शनशास्त्र’ असं म्हटलं गेलं.आपल्या संस्कृतीत एकंदरीत ज्ञान मिळवण्याचा उद्देश्य हा ‘जीवनदर्शन’ आहे. म्हणूनच नुसत्या शास्त्र चर्चा करणाऱ्या ‘पंडित’ जमाती पेक्षा अनुभवी संताना ह्या भूमीने डोक्यावर घेतले, आदराने त्यांच्या पादुका पालखीतून मिरवल्या. संतांच्या, महापुरुषांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा आजच्या काळात अभ्यास होणे गरजेचे आहे;कारण आजच्या काळातही ते ‘मोस्ट प्रॅक्टिकल’ आहेत आणि सर्व समस्यांना त्यांच्या जीवनाद्वारे , विचारांद्वारे उत्तरे मिळू शकतात.१६ ऑगस्ट म्हणजे रामकृष्ण परामहंसांचा महासमाधी दिन नुकताच होऊन गेला त्यानिमित्त विशेष लेख.

१८३६-१८८६ असा फक्त ५० वर्षांचा जीवनकाळ..परंतु येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी पुरून उरेल असा जीवनदर्शनाचा खजिना परामहंसांनी दिला.

बंगालमधील कामारपुकुर मध्ये रामकृष्ण महाराजांचा जन्म खुदीराम आणि चंद्रमणि देवी ह्यांच्या घरी झाला . खुदीराम निर्धन होते. सर्वसामान्य हिन्दू ब्राह्मणांप्रमाणे धार्मिक व परंपरावादी होते. वयाच्या ७व्या वर्षीच छोट्या गदाईच्या जीवनातून वडिलांचे छत्र हरवले.(गदाई, गदाधर,ठाकुर ही सर्व रामकृष्णांचीच नावे आहेत).अगदी लहानपणापासून शालेय शिक्षणाचा गदाईला तिटकारा होता.पण तो एक जन्मजात कलावंत होता. अभिनय करणे , मूर्ती बनवणे, नृत्य,गायन ह्यात तो रमत असे.जिज्ञासा आणि आव्हाने स्वीकारण्याचा स्वभाव असलेला गदाई सतत काहीतरी नवीन प्रयोग करण्यात उत्सुक असे. अंधश्रद्धा आणि मान्यता ह्यांना दोन हात करण्याची सवयच ह्या मुलात होती. त्यामुळे कुणीही कशाचीही भीती दाखवली की ते तो हटकून करणारच. रात्री एकट्यानं स्मशानात जाणं, भूतबाधा असलेल्या ( मानल्या गेलेल्या ) झाडांवर मध्यरात्री चढून बसून राहणं, ही निर्भयता त्याच्यात सहाव्या वर्षापासूनच आढळून येऊ लागली. थोड़ा मोठा झाल्यावर गदाईने आपल्या गावात नाटक कंपनी चालू केली. लेखन, दिग्दर्शन व अभिनय सारं काही गदाधर करीत असे. गदाई चे थोरले बंधू – रामकुमार संस्कृतचे पंडित होते. शाळासोडुन बिनबापाचा मुलगा नाटक्या झाला तर आयुष्याची माती होईल, याची त्यांना काळजी वाटू लागली. १८५२ साली रामकुमार गदाईला घेऊन कलकत्त्यास आले. गदाईला शिक्षणात टाकण्याचा प्रयत्न सुरु होण्याअगोदरच गदाईने भावाला शालेय शिक्षणातील आपली निरसता स्पष्ट शब्दात सांगून दिली. रामकुमारांचा नाईलाज झाला. त्यांनी गदाईला उपाध्येगिरीचं काम दिलं.लोकांच्या घरी पूजा करण्यात गदाईला खूप आनंद वाटत असे. मंत्र व विधींचं माहित करून घेण्याची त्याला गरज भासली नाही ! शंभर टक्के ईश्वराविषयी विशुद्ध भक्तीभाव असल्या वर कसली गरज !!?

“न जानामि दानं न च ध्यानयोगं
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि II “

जगदंबेविषयी असलेल्या भक्तीने ईश्वराने राणी रासमणीद्वारे गदाईला दक्षिणेश्वरी आणून सोडले. रामकुमारांच्या नावे औपचारिक दक्षिणेश्वर सोपवल्यावर अवघ्या वर्षभरानंतर (१८५६) रामकुमारांचे निधन झाले.त्यामुळे अनायसे ती वास्तू रामकृष्णांना मिळाली. पूजा- प्रसादाची सर्व जबाबदारी एकट्या गदाधरवर येऊन पडली. त्यांच्या पूजा पद्धतीत कुठलेही कर्मकांड अथवा विधि नव्हती ; होती तर प्रचंड ईशश्रद्धा आणि भक्तिभाव !!!

नारद भक्तीसूत्रात महर्षी लिहितात,
“सा त्वस्मिन् परप्रेमरूपा । अमृतस्वरूपा च ।।”

ह्या सूत्रावर खरे उतरत गदाई आता रामकृष्ण झाले. परंतु ईश्वर अनुभव जिथून होईल त्या सर्व खडतर साधना पूर्ण करण्याचे सामर्थ्य रामकृष्ण महाराजांत दिसते. कालीमातेचं प्रत्यक्ष दर्शन , भैरवी व तोतापुरी यांसारखे लाभलेले अधिकारी गुरु, त्यांच हनुमान होऊन सीतामाईंचं दर्शन घेणं, ख्रिस्ती- मुसलमान धर्मातील साधना करणं, मधुराभक्तीत विलीन होणं हा सगळा प्रवास साधकाला प्रेरित करणाराच आहे. “कुठलीही गोष्ट आई-कालीच्या आदेशानेच करणं” ह्यातील त्यांची भक्तीची अवस्थां, विलक्षण गूढता ह्यावर आपण काय लिहिणार ?! -पायींची वाहाणं पायीं बरीI!!!

धर्म, जाती, पंथ, वर्ण, संप्रदाय, आध्यात्मिक मार्ग ह्यांच्या खुल्या आणि छुप्या भेदाभेदात अडकलेल्या आजच्या समाजासही रामकृष्ण स्वतःच्या जीवनातून खुप मोठा संदेश देताहेत.
एका प्रसंगी साधना करताना गळ्यातल जानवं बाजूला पडलेलं हृदयने ( रामकृष्णांचा भाचा ) पाहिलं आणि हृदयनं खड़सावलं ” ब्राम्हणांन जानव्याचा त्याग करावा ?”
त्यावर रामकृष्ण म्हणाले, ” जानवं माणसाला त्याच्या उच्च वर्णाची आठवण करून देतं. ब्राम्हण असल्याचा नाहक दंभ या तीन पदरी सुतानं उद्भवतो. ईश्वर प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या तपाचरणात ब्राम्हण असणं या दंभाची किंमत शून्य आहे ”
रामकृष्ण महाराज इतकेच म्हणून थांबले नाहीत तर भेदाभेद, शिवाशिव ह्यांवर स्वतःच्या आचरणातूनच काही आदर्श दाखवले. प्रथम त्यांनी मंदिरात मुक्कामाला येणाऱ्या पांथस्थांची विष्ठा साफ केली. नंतर मंदिराच्या प्रांगणाबाहेर ज्या भिकाऱ्यांना प्रसाद दिला जाई त्यांच्या उष्ट्या पत्रावळी डोक्यावरून वाहून नेल्या. कालीचा वरदहस्त प्राप्त झाल्यानंतर परमहंस भिकाऱ्यांबरोबरच नव्हे, तर कुत्र्यांबरोबरही एकाच पत्रावळीत जेवू लागले.

रामकृष्ण आपलं तत्वज्ञान ४ शब्दांत सांगतात , ” जत मत तत पथ” अर्थात सर्व धर्म व संप्रदायांचे पथ प्रभूंकडेच जातात. खऱ्या अर्थाने समस्त मानवजातीला एका सूत्रात बांधणारा त्यांचा हा संदेश आहे.
अशा महान संदेशाला विश्वात घेऊन जाणारा ” वेदांत केसरी ” – स्वामी विवेकानंद रामकृष्णांना शिष्य म्हणून लाभला . खरेतर ह्यांची भेट होणं आणि त्यातही विवेकानंदांचं रामकृष्णांचा शिष्य होणं हे दोन्ही प्रसंग जरा आश्चर्यच आहे. कारण नरेंद्र ( विवेकांनदांचे संन्यासपूर्वीचे नाव) म्हणजे पाश्चात्य विज्ञानाचा तर्कनिष्ठ , पुरोगामी , निरीश्वरवादी आणि अष्टावधानी आणि एकीकडे रामकृष्ण त्यावेळचे एका मंदिराचे पुजारी आणि भक्त !! अशा दोघांची भेट होण्याचं कारण ठरली प्रा.विल्यम हेस्टीचं लेक्चर!! विल्यम वर्डस्वर्थची ‘एक्सकर्शन’ ही कविता शिकवतांना ‘एक्सस्टेटिक जॉय’ ह्या संदर्भावर बोलतांना हेस्टी म्हणाले ,
“Such an experience is very rare indeed, particularly, in modern times. However, I have come across a person who is blessed with this state of mind and he is Ramkrishna Paramhansa of Dakshineshwar. You can understand it if you go there and see it for yourself”
पुढे ह्या दोघांची भेट झाल्यावर नरेंद्रने आपला आजवर अनुत्तरित राहिलेला प्रश्न विचारला ” आपण ईश्वर पाहिला काय ? “ह्यावर रामकृष्ण म्हणाले ” होय !! अगदी जवळून. तू बसला आहेस त्यापेक्षाही अगदी अधिक जवळून !”हे ऐकून नरेंद्र हतबद्ध झाला आणि तात्काळ कलकत्याला निघून गेला. रामकृष्णांचं उत्तर ऐकून नरेंद्राच्या विचारांमध्ये वादळ उठले. तर्क आणि श्रद्धा ह्यांत प्रचंड मारामारी होऊ लागली. अगदी सहज स्वीकार करेल तो नरेंद्र कसला. रामकृष्णांचा शिष्य होण्यापूर्वी नरेंद्राने आपल्या गुरुची चांगलीच परीक्षा घेतली. पुढे हाच नरेंद्र रामकृष्णांच्या कुशीत “स्वामी विवेकानंद” झाला आणि ह्या शिष्याने आपल्या गुरूंचा संदेश संपूर्ण विश्वभर पसरवला.

रामकृष्ण कुठलेही तत्वज्ञान गोष्टी रूपात अगदी सोप्या भाषेत समजावत. अडाणी पासून पंडितांपर्यंत सर्वानाच समजेल अशी जादू त्यांच्या शिकवणीत होती. फक्त शिकवणच नाही तर समोरच्याला अनुभव प्राप्त करवून देण्यात त्यांचा अधिकार होता . एके दिवशी रामकृष्णांसमोर सहेतुक अद्वैतवादाचा विषय काढत नरेंद्र आपल्या ब्राह्म मित्राला म्हणाला , “वा!! काय खुळचटपणा आहे पहा! ताट ईश्वर, वाटी ईश्वर, भांडं ईश्वर आणि आपणही सारे ईश्वर!!”

रामकृष्णांनी काही न बोलता नरेंद्रला फक्त स्पर्श केला. नरेंद्र अगदी सहज त्या भावावस्थेत निघून गेला ….तसाच घरी गेला .त्याला सर्व पदार्थामध्ये ब्राम्हनुभूती होऊ लागली. अद्वैताची ती झलक होती; त्यानेच तो गांगरून गेला. पुढे हाच नरेंद्र विवेकानंद होऊन अमेरिकेत अद्वैतवादच महत्व ठासून सांगतो, ” See no difference between an ant and an angel….Remember that every worm is a brother of Nazarene.”
ठाकूर नरेंद्र बद्दल म्हणतात , ” नास्तिकता हे नरेनच बाह्यावरण होतं. मनोमनी तो ईश्वरभक्त होता.त्याच्या डोळ्यांत कोमलता आहे, करूणा आहे. अशी दृष्टी भक्तांनाच लाभते. ज्ञानी ( इथे -पुस्तकी किडे ) म्हणवणाऱ्यांची दृष्टी शुष्क असते. तशी नरेंद्रची नाही ”
वयाच्या ५० व्या वर्षी रामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झाला.एक पंडितजी रामकृष्णांना भेटायला आले. त्यांनी सुचवलं ” आपण आपलं मन जर आपल्या गळ्यावर एकाग्र केलं तर क्षणभरात फोड फुटून नाहीसा होईल आणि आपण रोगमुक्त व्हाल.” पण रामकृष्णांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावत उत्तर दिल,” पण क्षणभरासाठीही मी आईला विसरू चाहत नाही. ” अशाप्रकारे जगदंबेचा निस्सीम भक्त १६ ऑगस्ट १८८६ ला महासमाधीत विलीन झाला .

महान अमेरिकन बुद्धिवादी ख्रिस्तोफर ईशरवूड यांनी आपल्या रामकृष्ण परमहंसांच्या चरित्र लेखनाची सुरुवात “This is the story of a PHENOMENON” ह्या वाक्यानं केली आहे . ती अगदी खरी आहे.अशा ह्या महान संत व्यक्तिमत्वाला त्याच्या लाडक्या शिष्याच्या शब्दातच वंदन –
ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे ।
अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः ॥

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा:
Email id- [email protected]
Facebook-https://www.facebook.com/aniket.songire.9
Twitter- @ASongire

Summary: ramakrishna paramahamsa and his contributions