
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम
केरळमधील पूरपरिस्थितीत सैन्याची तिन्ही दले युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. येथील बिकट परिस्थितीत जवान महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. जीवाची बाजी लावून पूरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्याचे काम जवान करत आहेत. पूरपरिस्थितीमुळे पोहचणे कठीण झालेल्या ठिकाणी शौर्यचक्र विजेते कॅप्टन पी. राजकुमार यांनी एका घराच्या छतावर सी किंग ४२ बी चॉपर उतरवून २६ जणांचा जीव वाचवला आहे. परिसरातील मोठे वृक्ष आणि झाडांपासून सुरक्षित अंतर ठेवत चॉपर छतावर उतरवणे कठीण होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ३२ जणांना वाचवले आहे.
Amazed this @IndianNavy Seaking was able to land on this rooftop in Kerala during relief ops. Great work by chopper crews last 72 hours. pic.twitter.com/Ca7aZB73ZX
— Shiv Aroor (@ShivAroor) August 17, 2018
एका हेलिकॉप्टरने गर्भवती महिलेची पूराच्या पाण्यातून सुटका केल्याचा व्हिडिओ नौदलाने जारी केला होता. त्यात हेलिकॉप्टरची रस्सी महिलेच्या कमरेवर बांधण्यात येते आणि तिला वर खेचण्यात येते. तिला वाचवल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. कमांडर विजय वर्मा यांनी त्या महिलेची पूरपरिस्थितीतून सुटका केली होती.
बोटी आणि अद्ययावत उपकरणांसह विशेष इंजिनिअरिंग टास्क फोर्ससह सुमारे 700 जवान बचाव कार्य करत आहेत. गेल्या 9 दिवसात 4,800 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 13 अस्थायी पूल बनवले आहेत. त्यामुळे 38 ठिकाणांशी तुटलेला संपर्क जोडण्यात यश आले आहे. जवान दिवस रात्र मेहनत करून नागरिकांची या नैसर्गिक आपत्तीतून सुटका करतील असा विश्वास सैन्यदलाने व्यक्त केला आहे.




























































