
सामना ऑनलाईन । मुंबई
सोशल मीडियात कधी कोणती गोष्ट चॅलेंज म्हणून व्हायरल होईल आणि त्याचं खूळ पसरेल, ते सांगता येत नाही. पण, या वेडापायी पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांवर याचा ताण पडतो. गेल्या वर्षी ब्ल्यू व्हेल या भयानक मोबाईल गेमच्या चॅलेंजमुळे हाहाकार माजला होता. यंदा मोमो आणि किकी या चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. यात आता अजून एका चॅलेंजची भर पडली आहे. मेरी पॉपिन्स नावाचं हे जीवघेणं चॅलेंज वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे.
मेरी पॉपिन्स या चॅलेंजमध्ये एका मोठ्या छत्रीची आवश्यकता असते. ही मोठी छत्री घेऊन एखाद्या उंच ठिकाणी किंवा घर-दुकानं यांच्या छपरावर घेऊन जावं लागतं. तिथे ती छत्री उघडायची आणि पावसात धरतो तशी डोक्यावर धरून छतावरून उडी मारायची, असं हे चॅलेंज आहे. यात हाततल्या छत्रीचा वापर पॅराशूटसारखा करावा लागतो. हे चॅलेंज नेमकं कोणाच्या डोक्यातून आलं, ते मात्र कोडं आहे. या चॅलेंजचं नाव हे डिस्नेमधील मेरी पॉपिन्स या व्यक्तिरेखेवरून ठेवण्यात आलं आहे. पण, हे चॅलेंज अत्यंत धोकादायक आहे. यात गंभीर दुखापत होऊ शकते किंवा जीवही जाऊ शकतो. तरीही या चॅलेंजला स्वीकारून ते पूर्ण केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
इंटरनेटच्या जगात नवनवीन शोधण्याच्या हव्यासापोटी अशी चॅलेंजेस केली जात असल्याचं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यात धोका जितका जास्त तितकं चॅलेंज अधिक लोकप्रिय होताना दिसत आहेत.
summery- new dangerous challenge named mary poppines


























































