
सामना प्रतिनिधी । लातूर
येथील दयानंद कला महाविद्यालय, एस.एम.आर. स्विमिंग पूल व लातूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबईने ठाण्याला पराभूत करत अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
लातुरात प्रथमच राज्यस्तरीय वरिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतर जिल्हा स्पर्धा २० व २१ ऑगस्ट २०१८ रोजी पार पडल्या. स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे विरुद्ध मुंबई आणि नागपूर विरुद्ध मुंबई उपनगर असे सामने झाले. त्यात ठाण्याने मुंबईवर तर ३ – ० असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नागपूर विरुद्ध मुंबई उपनगर यांच्या दरम्यान झालेला उपांत्य सामना मुंबई उपनगर ने ३- २ असा जिंकला व स्पर्धेची अंतिम फेरी गाठली . या स्पर्धेतील अंतिम सामना ठाणे विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात खेळविला गेला. अंतिम फेरीत ठाणे विरुद्ध मुंबई उपनगर संघाचे चुरशीचे सामने झाले. यात पुरुष एकेरीत मुंबई उपनगरच्या कौशल धर्मामर याने ठाण्याच्या अमन संजय याचा २१ – १९ , २१ – १८ असा पराभव केला.
महिला एकेरीत ठाण्याच्या रेवती देवस्थळे हीने मुंबई उपनगरच्या कल्पिता सावंत हीचा २१ – १०,२१ – १३ असा पराभव केला. त्यानंतर दुहेरी सामने झाले. यात पुरुष दुहेरीत ठाण्याच्या संघाने उपनगर वर २ – १ अशी मात केली. दुहेरी महिलांच्या सामन्यात उपनगरच्या संघाने ठाण्याच्या संघावर २ – १ अशी मात केली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात मुंबई उपनगर कडून दीप रंभीया व पूजा देवळेकर ने तर ठाण्याकडून अक्षय राऊत व सायली राणे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. मुंबई उपनगरने हा सामना ठाणे संघावर २ – ० अशी मात करीत जिंकला.
स्पर्धेतील उप विजेत्या संघाला महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांच्या हस्ते तर विजेत्या संघाला जागृती शुगर्स चे संचालक दिलीपराव माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.



























































