आशीष खेतान यांचा ‘आप’ला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आठ दिवसांत आम आदमी पार्टीला दुसऱयांदा खिंडार पडले आहे. आशुतोष यांच्यापाठोपाठ आज आशीष खेतान यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. 15 ऑगस्ट रोजीच त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला होता.

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये प्रचंड धुसफूस चालू आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या बंडखोरीचे वादळ अधूनमधून उठत असतानाच आठ दिवसांपूर्वी पत्रकारितेतून राजकारणात आलेले आशुतोष यांनी ‘आप’चा राजीनामा दिला. त्यानंतर आज आशीष खेतान यांचा राजीनामा आला. खेतान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजीनाम्याचा इन्कार केला नाही.

– 2019 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीत आशीष खेतान यांची नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा होती. 2014 मध्ये याच मतदारसंघात खेतान यांना भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी पराभूत केले होते. परंतु पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी खेतान यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते नाराज होते.