
सामना ऑनलाईन, मुंबई
रेल्वे भरती प्रक्रियेत रेल्वेमंत्र्यांचा विशेष कोटा असतो. त्या कोटय़ातून तुम्हाला हमखास नोकरी मिळवून देऊ, अशी बतावणी करीत अनेक बेरोजगार तरुणांना 93 लाखांचा चुना लावणाऱया दोघा भामटय़ांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी भारतीय रेलमधील गट क व गट ड या पदांकरिता तसेच रेल्वे संरक्षण दलातील उमेदवार भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती. या भरतीसाठी लाखो तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. यातील काही अर्जदारांना आरोपींनी हेरले. रेल्वेमंत्र्यांचा भरतीप्रक्रियेत विशेष कोटा असतो. त्या कोटय़ातून तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असे आमिष आरोपींनी त्यांना दाखवले. त्यानंतर प्रत्येकाकडून आरोपींनी पाच ते सहा लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर भामटय़ांनी तरुणांना टाळण्यास सुरुवात केली. दरम्यान, हा प्रकार रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत कळला. त्यामुळे याची तत्काळ गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून वसईत राहणारा रुफूस डावरे आणि त्याचा साथीदार मनजितसिंग चित्रोले या दोघांना अटक केली.
सात जणांना फसविल्याची कबुली
रुफूस हा आर्थिक सल्लागार म्हणून काम करतो तर मूळचा दिल्लीचा असलेला मनजितसिंग हा प्रॉपर्टी एजंटचे काम करतो. दोन्ही आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी मिळून त्यांच्या अन्य दोघा साथीदारांच्या मदतीने बेरोजगार तरुणांना चुना लावला. आम्ही सात उमेदवारांकडून 45 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे रुफूस आणि मनजितसिंग यांनी पोलीस चौकशीत कबूल केले आहे.




























































