
सामना ऑनलाईन । लंडन/बर्लिन
पाकिस्तानबाबत कोणतेही ठोस धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही. तसेच डोकलाम प्रश्नाकडेही इव्हेंटप्रमाणे ते पाहत आहेत असे टीकास्त्र सोडतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये आजही चिनी सैन्य आहे अशी माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अरब देशांमधील ‘मुस्लिम ब्रदरहुड’सारखा आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
जर्मनी आणि ब्रिटनच्या दौऱयावर राहुल गांधी आहेत. काल बर्लिन येथे बोलताना राहुल गांधींनी अरब देशांनी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’शी संघाची तुलना केली. ‘मुस्लिम ब्रदरहूड’च्या संकल्पनेशी संघाची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप त्यांनी केला. 1947 मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा हिंदुस्थान हा स्वतंत्र देश म्हणून उभा राहू शकतो यावर पाश्चिमात्य देशांचा विश्वास नव्हता. हिंदुस्थानातील दिग्गजांनी, हजारो लोकांनी संस्था उभ्या केल्या आणि पाश्चिमात्य देशांना चुकीचे ठरविले, मात्र आज या संस्थांवरच आघात केले जात आहेत, अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली.
देशासाठी राहुल गांधींनी सुपारी घेतली आहे का? भाजपचा सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम ब्रदरहूडबरोबर तुलना केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. हिंदुस्थानसाठी राहुल गांधींनी सुपारी घेतली आहे का? कॉण्ट्रक्ट किलरचे काम करणे त्यांनी थांबविले पाहिजे. हिंदुस्थानात काही दहशतवादी संघटनांचे राज्य आहे का? जनतेने दहशतवादी संघटनेचे सरकार निवडून दिले आहे का, असे सवालही पात्रा यांनी केले आहेत.
summary- rahul gandhi slams modi over doklam























































