
सामना ऑनलाईन, बीड
ठेवीदारांना अधिक व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या शुभ कल्याण मल्टीस्टेटचे अध्यक्ष दिलीप आपेट यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे, आपेट पुण्यातील डी.आर.टी.सी. कोर्टात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीपासूनच मिळाली होती. तिथे सापळा रचून आपेट यांना अटक करण्यात आली.
बीड जिल्ह्यात अंदाजित १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आपेट यांच्यावर आहे. शुभकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून घोटाळा केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात १० पोलीस ठाण्यात आपे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
आपेट शंभू महादेव साखर कारखान्याचा लिलाव प्रकरणी पुण्यातील डी. आर.टी.सी. कोर्टात आले होते. यावेळी बीडच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी त्यांना अटक केली.रात्री ३ च्या सुमारास त्यांना बीड मध्ये आणण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वा आपेट यांना अंबाजोगाई येथील न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.




























































