ठाण्यात आणखी एक कॉल सेंटर घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून करोडो रुपये उकळणाऱया आणखी एका बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी ठाणे क्राइम बँचने अशाच प्रकारच्या बनावट कॉल सेंटरचा ठाण्यातच पर्दाफाश केला होता. पोलिसांनी मीरा रोड येथून सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

भारतीय दंड संविधानाच्या कलम 420 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठय़ा संख्येने कॉम्प्युटर्स जप्त करण्यात आले आहेत. संबंधित सात जण अमेरिकेतील कर्ज घेतलेल्या नागरिकांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवत. त्यानंतर या नागरिकांना फोन करून आपण कर प्राधिकरणातून बोलत असून तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुम्हाला अमुक कर भरावा लागेल असे सांगत. तुम्ही बिटकॉइनच्या माध्यमातून कर भरू शकता, असेही सांगण्यात येई. अशाप्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात जुबेर शेख (26), सॅबिओ गोन्साल्विस (42), राजू राठोड (29), हर्ष अन्वर काझी (23), सिद्धार्थ पिल्लई (22), सौरभ झा ( 29) आणि सिद्धी नायर (29) या सात जणांना अटक करण्यात आली आहे.