मेट्रोच्या कामांमुळे दादर शिवाजी पार्कचे साडेसात हजार टेलिफोन डेड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मेट्रोच्या कामामुळे मुंबईतल्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे तर दुसरीकडे दादर, माहीम, शिवाजी पार्क, प्रभादेवी परिसरातील महानगर टेलिफोन निगमच्या किमान सात ते साडेसात हजार टेलिफोन लाइन बंद पडल्या आहेत. मेट्रोच्या कामासाठी भूमिगत कामे करताना टेलिफोनच्या केबल उखडून टाकल्याने टेलिफोन सेवा बंद पडली आहे.

मेट्रो रेल्वेसाठी टनेल खणण्याचे काम सध्या दादरच्या गोखले रोड परिसरात सुरू आहे. या भागात शिवाजी पार्क टेलिफोन एक्स्चेंज आहे. सुजाता व सचिन हॉटेलच्या भागात जमिनीखाली महानगर टेलिफोन एक्स्चेंजच्या केबलचा प्रमुख बॉक्स आहे. त्यातून या केबल शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात फिरवण्यात आल्या आहेत. मेट्रो रेल्वेचा टनेल खणताना टेलिफोनच्या केबल उखडल्या आहेत. परिणामी 244, 2445, 2446, 2447 या क्रमांकाने सुरू होणाऱया किमान सात ते साडेसात हजार टेलिफोन लाइन बंद असल्याचे टेलिफोन निगममधील कर्मचाऱयाने सांगितले. टेलिफोन बंद असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पूर्वी मुसळधार पावसामुळे टेलिफोन सेवा बंद पडत होती, पण आता हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मेट्रोच्या कामांचा मोठा फटका टेलिफोनच्या सेवेला बसला आहे. टेलिफोन खात्यात आधीच कर्मचारी कमी असल्यामुळे टेलिफोन सेवा दुरुस्त होण्यात विलंब होतो, असे कर्मचाऱयांनी सांगितले.

summary : Underground Metro Work Kills MTNL Phone Lines Across  Dadar