
सामना प्रतिनिधी। जिंतूर
शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीक प्राथमिक उर्दू शाळेची भिंत अचानक सोमवारी दुपारी १ :३०च्या सुमारास कोसळली. यात चौथी वर्गातील ७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून ही भिंत बाहेरील बाजूस कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
जिंतूर शहरातील उस्मानपुरा भागात अब्दुल माबूद हुस्नोद्दीन कुरेशी यांची जनसेवा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित हजरत अबूबकर सिद्दीक प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळा आहे. यात पहिली ते सातवी वर्गापर्यंत एकूण ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे सोमवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शाळा सुरू झाली. दुपारी १:३० ते २ च्या सुमारास ४ थी व ५वी वर्गात तास चालू असताना अचानक या दोन्ही वर्गाची भिंत बाहेरील बाजूस कोसळली. जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. भिंत पडताना विटांचा मार लागून शाळेतील ४ थी वर्गात शिक्षण घेणारी स. अंशीरा स. मोहसीन, खिजरा तालेब चाऊस, रुमैय्या नसीब खा, हूमेरा नसीब खा, फातेमाबी शेख अझर, सुमैय्या पैजुलला खा, सानिया रहीम शेख विद्यार्थिनीं जखमी झाल्या आहेत. इतर काही विद्यार्थ्यांना मुक्कामार लागला आहे. शाळेची भिंत कोसल्याचे माहिती होताच असंख्य पालकांनी शाळेकडे धाव घेतली. गेल्या आठवड्यात शहरासह परिसरात २-३ दिवस जोरदार पाऊस पडला. त्यामुळेच कमकुवत भिंत पडली असून याच वर्गाच्या समोरील बाजूच्या भिंतीची अशीच अवस्था झाली आहे.































































