
सामना ऑनलाईन, मुंबई
तिकीट दर वाढवून पुढील महिन्यापासून पुन्हा ट्रॅकवर येण्यास मोनो रेल सज्ज झाली आहे. मोनो रेलचा कमाईपेक्षा सुरक्षेवरच अधिक खर्च होत असल्याचे उघड झाले आहे. सुरक्षेवर मोनो रेलचा जितका खर्च होतो त्यातील 62 टक्के इतकीच मोनो रेलची कमाई आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मोनो रेलचा खर्च भागवणे कठीण होत असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. मोनो रेलच्या 8.9 किलोमीटर मार्गाच्या सुरक्षेसाठी किती खर्च होतो याची माहिती एका वृत्तसंस्थेने एमएमआरडीएकडे मागितली होती. एप्रिल ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मोनो रेलचा उत्पन्नापेक्षा दुप्पट खर्च सुरक्षेवर झाला. या कालावधीत 1.91 कोटी रुपये उत्पन्न मोनो रेलला मिळाले.
सुरक्षेबरोबरच खासगी श्वान पथकावर वार्षिक 24 लाखांचा खर्च
सुरक्षा रक्षकांबरोबरच मोनो रेलच्या स्थानकांवर तैनात करण्यात आलेल्या खासगी संस्थांच्या श्वानपथकासाठी वार्षिक 24 लाख रुपये द्यावे लागले. 2014 मध्ये मोनो रेल सुरू झाल्यापासून आणि अगदी गेल्या नोव्हेंबरमध्ये ती बंद झाल्यापासून आजतागायत या श्वान पथकाला वार्षिक 24 लाख रुपये दिले जात आहेत.
15 कोटी कमाई, 31 कोटी खर्च
2 फेब्रुवारी 2014 पासून मोनो रेल सुरू झाली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोच्या दोन डब्यांना आग लागल्याच्या घटनेनंतर ती बंद करण्यात आली. फेब्रुवारी 2014 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत मोनो रेलने फक्त 15.62 कोटी रुपये इतकीच कमाई केली. पण सात स्थानके आणि वडाळा डेपोच्या सुरक्षेवर 31.71 कोटी रुपये खर्च झाले.
सुरक्षारक्षक कमी केल्याने 2 कोटींची बचत
2014 आणि 2016 या कालावधीत सुरक्षा महामंडळाने मोनो रेलची स्थानके आणि डेपोमध्ये 331 सुरक्षारक्षक तैनात केले होते. सुरक्षेवरचा खर्च कमी करण्यासाठी जुलै 2016 मध्ये त्यांची संख्या कमी करून 243 करण्यात आली. त्यातून 2 कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिली.



























































