
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
पंचवीस पेक्षा कमी पटसंख्येच्या अंगणवाड्या बंद करु नका या मागणीसाठी बुधवारी रत्नागिरीत महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
प्रमोद महाजन क्रीडा संकुल ते जिल्हापरिषद दरम्यान हा मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.राज्यातील पंचवीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे राज्यभर अंगणवाडीसेविका आंदोलने करत आहेत. बुधवारच्या आंदोलनात काही प्रलंबित मागण्यांचा पुर्नच्चार करण्यात आला. त्यामध्ये एकात्मिक बालविकास योजनेचे बजेट वाढवून अंगणवाड्यांचे बळकटीकरण करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्या,५० टक्के मुख्यसेविकांच्या जागा अंगणवाडी सेविकांमधून भरा,अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एक हजार रुपये द्या,मिनी अंगणवाड्या त्वरीत नियमित करा,अंगणवाडी सेविकांना छापील रजिस्टर द्या,सेवा समाप्तीच्या लाभामध्ये तिप्पट वाढ करा अशा मागण्या केल्या आहेत.





























































