गावाकडच्या तरुणासोबत समलैंगिक संबंध आणि उधारी जीवावर बेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गावाकडच्या तरुणासोबत असलेले समलैंगिक संबंध तसेच त्याच्याकडे ठेवायला दिलेली 26 हजारांची रोकड मालाडच्या शुक्ला डेअरीत काम करणाऱ्या 50 वर्षीय इसमाच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मालाडच्या रेल्वे पटरीत मृतावस्थेत सापडलेल्या रामेश्वर मिश्रा ऊर्फ पंडित याच्या हत्येचा उलगडा करताना रेल्वे पोलिसांनी त्याच्याच सहकाऱ्याला अटक केली आहे. आरोपीच्या चौकशीत हत्येचे कारण समोर आले आहे.

26 ऑगस्ट रोजी मालाड-गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान एका व्यक्तीचा हातपाय बांधलेला आणि गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे क्राइम ब्रँचने देखील समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे अंमलदार सतीश क्षीरसागर, श्रीकृष्ण चव्हाण, विजय ढवळे, प्रवीणसिंग घार्गे, सुरेश येला, जयेश थोरात, सतीश फडके, अमित बडेकर आदींच्या पथक तपास करीत असताना रेल्वे पटरीबाहेर रस्त्यावर असलेल्या जॉय वाईन शॉपजवळ पोलिसांना महत्त्वाचा क्ल्यू सापडला. तेथील सीसीटीव्हीत मृत व त्याच्यासोबत असलेल्या तरुणाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्याआधारे चौकशी केली असता मृताचे नाव रामेश्वर मिश्रा (50) असे असून तो मालाडच्या शुक्ला डेअरीत काम करत होता अशी माहिती मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन चौकशी केली असता त्या दिवशी त्याचाच गाववाला सलीमअली मुन्ना अन्सारी (28) हा त्याच्यासोबत होता हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्याने गुह्याची कबुली दिली.

पैसे मागतो, समलैंगिक संबंधाची भीती दाखवतो

गेल्या चार वर्षांपासून अन्सारी आणि मिश्रा शुक्ला डेअरी येथे एकत्र काम करीत होते, तेथेच राहत होते. तेव्हापासून दोघांमध्ये समलैंगिक संबंध सुरू होते. त्यात मिश्राने त्याचे 26 हजार रुपये अन्सारीकडे ठेवण्यास दिले होते. हे पैसे दे असा तगादा मिश्राने लावला होता. पैसे दिले नाहीस तर गावाकडे आपल्या संबंधाची वाच्यता करेन अशी धमकी तो देत होता. त्यामुळे 26 तारखेला त्याला दारू पाजली. मग रेल्वे पटरीत नेऊन त्याचा गळा चिरून हातपाय बांधून मृतदेह तेथे फेकला. पोलीस पकडणार नाहीत असा समज होता, पण तरीही पोलिसांनी त्याला पकडले.