बलात्काराच्या आरोपाखाली असलेल्या आरोपींची 28 वर्षांनंतर निर्दोष सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन जणांची तब्बल 28 वर्षांनी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 1990 साली हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सत्र आणि उच्च न्यायालयाने त्यांना दहा वर्षांची सजाही सुनावली होती. मात्र, फिर्यादी पक्षाने मांडलेल्या युक्तिवादातली तफावत लक्षात आणून देत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल आरोपींच्या बाजूने दिला.

एका महिलेने 1990 मध्ये या दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ही महिला या दोघांनाही ओळखत होती. तिच्या आरोपांनुसार, घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी त्या दोघांसोबत तिचा वाद झाला होता. त्यानंतर त्या दोघांनी तिला खेचत त्यांच्या शेतात नेलं आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या खटल्याच्या सुनावणीवेळी तिने शरीरावरील जखमा आणि कपड्यांचा पुरावा दिला होता. त्यावरून 1992मध्ये सत्र न्यायालयाने या दोघांनाही १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती.

मात्र, यानंतर त्या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादी पक्षाकडून केल्या गेलेल्या युक्तिवादातल्या त्रुटी समोर आणल्या. त्यात सर्वात मोठी त्रुटी ही पुराव्यांमध्ये असल्याचं समोर आलं. महिलेच्या तपासणीनंतर तिच्या शरीरावर फक्त एक जखम असल्याचं समोर आलं होतं. तसंच, कपड्यांवर वीर्य अथवा रक्ताचे डागही नव्हते. त्यामुळे हा पुरावा बलात्कार झाल्याचं प्रमाण देऊ शकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसंच, या दोघांचा महिलेशी वाद असल्याने तिने सुडापोटी हे कृत्य केल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे तब्बल २८ वर्षांनंतर या दोन्ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

after-28-years-sc-acquitted-two-gang-rape-accuse