
सामना प्रतिनिधी । मुंबई
नालासोपाऱयासह राज्यातील इतर अन्य भागांतून जप्त करण्यात आलेली स्फोटके आणि शस्त्रसाठ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अविनाश पवार याला आणखी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागणाऱया दशहतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मुंबई सत्र न्यायालयाने आज चांगलेच थोबाडले. तुमच्या तपासात अनेक त्रुटी आणि तेव्हढेच कच्चे दुवे आहेत. रिमांड अर्जात तपासाचा संपूर्ण तपशील देखील नाही. केस डायरी देखील यथातथाच आहे. असे असताना तुम्ही 14 दिवसांचा रिमांड मागताच कसा असा खरमरीत सवाल करत सत्र न्यायाधीश विनोद पडळकर यांनी एटीएसला चांगलेच फैलावर घेतले. तसेच पवारला 14 दिवस कोठडीत पाठविण्यास स्पष्ट नकार दिला. आधी तपासाचा सविस्तर तपशील द्या. तोपर्यंत जास्त दिवस कोठडी मिळणार नाही, असे सुनावत न्यायाधीशांनी पवारला फक्त 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवले.
बेकायदा शस्त्रसाठय़ाप्रकरणी अविनाश पवार याला एटीएसने गेल्याच आठवडय़ात घाटकोपर येथून अटक केली. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएसए) अटक करण्यात आलेल्या पवारची पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे त्याच्या कोठडीची मुदत 14 दिवसांनी वाढवून द्यावी अशी मागणी एटीएसने केली. एटीएसने सादर केलेल्या रिमांड अर्ज आणि केस डायरीवर नजर फिरवल्यानंतर सत्र न्यायाधीश पडळकर प्रचंड संतापले.
दरम्यान, एटीएसने अटक केलेल्या आरोपींच्या हिटलिस्टवर श्याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रितू राज यांचाही समावेश होता. तसेच त्यांची हत्या करण्यासाठी या आरोपींनी रेकीदेखील केली होती, अशी माहिती एटीएसने
आरोपींच्या हक्काशी तडजोड नाही
अर्धवट माहिती आणि अर्ध्यामुर्ध्या तयारीने यापुढे कोर्टात येऊ नका, असा एटीएसला दम भरतानाच न्यायाधीश पडळकर यांनी आरोपीच्या मूलभूत अधिकाराचाही मुद्दा उपस्थित केला. एखादी व्यक्ती आरोपी असली तरी घटनेने त्या व्यक्तीला देखील मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या अर्धवट माहितीच्या आधारावर आम्ही आरोपीच्या हक्काशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू शकत नाही, असेही न्यायाधीशांनी एटीएसला सुनावले.

























































