
सामना ऑनलाईन । बंगळुरू
हिंदुस्थान ‘अ’ व ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यामध्ये येथे चारदिवसीय कसोटी सामना सुरू असून दुसर्या दिवशी मराठमोळ्या अंकित बावणे याने नाबाद 91 धावांची झुंजार खेळी साकारली. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव 243 धावांवर गारद झाल्यानंतर हिंदुस्थान ‘अ’ संघाने पहिल्या डावात 274 धावा तडकावल्या. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसर्या दिवसअखेरीस 1 बाद 42 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 11 धावांनी पुढे आहे.
हिंदुस्थान ‘अ’ संघातील फलंदाजांना पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. रविकुमार समर्थने 25 धावांची, मयांक अग्रवालने 47 धावांची, अभिमन्यू इस्वरनने 36 धावांची आश्वासक खेळी केली, पण यांच्यापैकी एकालाही खेळपट्टीवर उभे राहून हिंदुस्थान ‘अ’च्या धावसंख्येत मोठी भर घालता नाही. पण अंकित बावणे याने 159 चेंडूंत तीन षटकार व सहा चौकारांसह नाबाद 91 धावांची खेळी करून हिंदुस्थान ‘अ’ संघाला पहिल्या डावात 31 धावांची आघाडी मिळवण्यात वाटा उचलला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाकडून मायकेल नेसरने चार आणि जॉन हॉलंडने तीन बळी बाद केले.
























































