
सामना प्रतिनिधी, देवगड
किंजवडे-परबवाडी ओहोळानजिक झालेल्या एसटी अपघात प्रकरणी देवगड आगाराचे चालक बापू लक्ष्मण काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना सोमवारी सायं.6.30 च्या सुमारास किंजवडे-परबवाडी याठिकाणी घडली.
देवगड आगारातील चालक बापू काळे याला बसच्या वेगावर नियंत्रण राखता न आल्याने बस ओढा कम पुलाच्या डाव्या बाजूस 30 फूट खाली जाऊन पल्टी घेत पुन्हा उभी राहिली व गंभीर अपघात झाला. या अपघातात एसटीचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या बसमधून प्रवास करणारे प्रवासी संगमी धाकू जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचार सुरू आहेत. तसेच प्रकाश धाकु जाधव यांनाही या अपघातात दुखापत झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त चालक बापू काळे, वाहक कुशल कदम यांनाही किरकोळ दुखापत झाली. अपघातस्थळी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढण्यात आले व 108 रुग्णवाहिकेद्वारे देवगड रुग्णालयात आणण्यात आले.
अधिक माहिती अशी की, देवगड आगाराची एम.एच. 20 बीएल 0281 ही बस डोबवाडी-देवगड या परतिच्या मार्गावर प्रवास करत असताना हा अपघात किंजवडे-परबवाडी ओहोळानजीक चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने घडला. अपघाचे वृत्त समजताच आगारव्यवस्थापक डी.एम.चव्हाण, विभागीय वाहतूक अधिक्षक मोहनदास खराडे, उपयंत्र अभियंता अ.शा.मांगलेकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. जखमी प्रवाशांवर एसटी प्रशासनामार्फत उपचार करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, तन्वी चांदोसकर, विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. या अपघात प्रकरणी देवगड आगाराचे चालक बापू काळे यांच्यावर भादंवि कलम 279, 337 व मोटार वाहन अपघात 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम.एम.पानसरे करित आहेत.
summary- ST driver booked for accident in devgad

































































