
सामना प्रतिनिधी । मुखेड
शेतातील उडदाची रास मळणी यंत्राद्वारे करत असताना अचानक यंत्रात हात अडकून संपूर्ण शरीरच यंत्रात गेल्याने एका शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता बेळी (बु) येथे घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मुखेड तालुक्यातील बेळी (बु) येथील युवक शेतकरी मनोज हनमंतराव जुन्ने (२२) याच्या शेतात उडदाची रास चालू होती. यासाठी त्यांनी भाड्याने मळणी यंत्र आणले होते. मळणीयंत्र अचानक बंद पडल्याने मनोज यंत्र का बंद पडले हे पाहत असताना मळणीयंत्र अचानक चालू झाल्याने प्रथम हात अडकले नंतर संपूर्ण शरीर यंत्रात गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून ही घटना समजताच सरपंच सुरेश पाटील बेळीकर, माजी उपसरपंच गणेश पाटील, शिवसेनेचे पंडीत पाटील बेळीकर, पोलीस पाटील, डॉ. किशन इंगोले हे घटना स्थळी दाखल झाले होते.



























































