
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ‘इसिस’शी संबंधित इस्लामिक स्टेट इन जम्मू-कश्मीर या संघटनेचे हे दहशतवादी आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये घातपाती कारवाया करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
परवेझ राशीद आणि मजशेद जाहूर असे जेरबंद केलेल्या दहशतवाद्यांचे नाव असून, दोघेही कश्मीर खोऱयातील शोपियाँ येथील आहेत. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी असलेले हे दहशतवादी इस्लामिक स्टेट इन जम्मू-कश्मीर संघटनेशी संबंधित आहेत. याआधी हे दोघे हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी होते.
या दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुले, 10 काडतुसे आणि चार मोबाईल जप्त केले आहेत. शस्त्रांची खरेदी उत्तर प्रदेशातून केल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. दिल्लीहून कश्मीर खोऱयात दहशतवादी जात होते. लाल किल्ल्याजवळ जामा मशीद बसस्टॉपवर दोघांना जेरबंद केले.
दिल्लीमध्ये घातपात करण्याचा कट नव्हता असे दहशतवाद्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, सध्या हिंदूंचे सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण आहेत. या काळात अन्य शहरांमध्ये घातपात करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असावा. आणखी काही दहशतवादी दिल्लीत लपले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कश्मीर खोऱयात ‘इसिस’चे जाळे
कश्मीर खोऱयात ‘इसिस’चे जाळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दगडफेक आणि हिंसाचारावेळी अनेकदा कश्मिरात ‘इसिस’चे झेंडे फडकविल्याच्या घटना घडल्या आहेत. इस्लामिक स्टेट इन जम्मू-कश्मीर ही ‘इसिस’चीच दहशतवादी संघटना आहे. उमर नजीर आणि आदिल थोकर हे या संघटनेचे जम्मू-कश्मिरातील म्होरके आहेत.
बदला घेणार; पाकची धमकी
सीमेवर मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशोब चुकता करू अशी धमकी देऊन पाकचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी हिंदुस्थानविरुद्ध गरळ ओकली आहे. जम्मू-कश्मिरातील फुटीरवाद्यांच्या कारवायांनाही बाजवा यांनी पाठिंबा दिला आहे. पाकच्या रक्षणासाठी आतापर्यंत 76 हजार सैनिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या रक्ताचा हिशोब चुकता करू, असे बाजवा म्हणाले. यावेळी त्यांनी कश्मिरातील फुटीरवाद्यांचे आभार मानले. 1965 आणि 1971च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो. त्यामुळेच पाकिस्तान अण्वस्त्र्ासज्ज झाला, असे त्यांनी सांगितले.


























































