महाराष्ट्रातील प्लॅस्टीक बंदीचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टीकबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बंदीचं आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक व्हायला लागलं आहे.  संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक एरिक सोलहाईम यांनी या बंदीचं तोंडभरून कौतुक करताना म्हटलंय की ‘महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्लॅस्टीकबंदी झाली आहे ती अत्यंत लक्षणीय आहे’

गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रात प्लॅस्टीक, थर्माकोलवर बंदी

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की सोलहाईम हे महाराष्ट्रात प्लॅस्टीकबंदी किती यशस्वी प्रमाणात झाली आहे हे तपासण्यासाठी आणि त्याचे चित्रीकरण करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांनी अनेक दुकानांना भेटी दिल्या आणि प्लॅस्टीकची भांडी मिळतील का अशी विचारणा केली. त्यांना बहुतांश दुकानकारांनी सांगितलं की प्लॅस्टीकची भांडी हवी असतील तर ती विकत घेण्यासाठी त्यांना दुसऱ्या राज्यात जावं लागेल कारण महाराष्ट्रात प्लॅस्टीकवर बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये गुढी पाडव्यापासून म्हणजेच १८ मार्चपासून प्लॅस्टीकवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी लागू झाल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली होती. या टीकाकारांनाही सोलहाईम यांनी उत्तर दिलं आहे. अशा निर्णयांची फळं तत्काळ मिळत नसतात, त्याला थोडा अवधी देणं गरजेचं असतं. बंदी अधिक प्रभावी होण्यासाठी काय उपाय करायला हवेत असं विचारलं असता त्यांनी बाजारात असलेलं प्लॅस्टीक माघारी घेण्यासाठी सक्षण यंत्रणा उभारणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणा!; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

सोलहईम हे जागतिक पर्यावरण कृती परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत पर्यावरणासाठी झटणारी, शहरे, विभाग,राज्ये, देश,कंपन्या नागरीक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले जातात, त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं. या परिषदेत महाराष्ट्राच्या प्लॅस्टीकबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीचाही गौरव केला जाण्याची शक्यता आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात प्लॅस्टीकबंदी साठी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सर्व स्तरातून जबरदस्त पाठींबा मिळाला होता. त्यांनी केलेल्या मागणीनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तातडीने पावले उचलत प्लॅस्टीकबंदीचा निर्णय जाहीर केला होता.