
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
घाटी रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून तापसदृश साथीचे रुग्ण वाढले असून, घाटीत ६ डेंग्यू, २ स्वाइन फ्ल्यूसदृश, तर २२४ तापाचे आणि ३४ न्यूमोनियाचे रुग्ण दाखल झाल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवावर साथरोगाचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एक ऑगस्टपासून घाटीत तापाचे २३० रुग्ण दाखल झाले. दररोज तापाचे सहा ते आठ रुग्ण दाखल होत आहेत. त्यात डेंग्यू, न्यूमोनियाचे ६ रुग्ण आढळले तर स्वाइन फ्ल्यूच्या चार रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांच्यावर घाटीच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्या वाढल्याने आयसोलेशन वॉर्डला महिलांचा वॉर्ड करण्यात आला, तर वॉर्ड ५ सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
मनपाचा पुढाकार
गणेशोत्सवात साथरोगाची चिन्हे दिसताच त्याची गंभीरपणे दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज दुपारी तीन वाजता शहरातील आरोग्य अधिकाNयांची तात्काळ बैठक बोलावली. घाटीला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे व मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांना दिले. तर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू टेस्टिंगच्या ५० किट तात्काळ पोहचवत असल्याचे घाटी प्रशासनाला सांगितले.
प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काळजी घ्या
या संकटावर मात करण्यासाटी औषध विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या की, “तापाची साथ आहे, मच्छर चावणार नाहीत यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. धुणीभांडी झाल्यावर महिलांनी ती जागा स्वच्छ धुवावी. कुंड्या व शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका.” तसेच ताप, सर्दी, खोकल्याकडे यावेळी दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
तापसदृश साथ, घाबरण्याचे कारण नाही
ही तापसदृश साथ आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. घाटीत रुग्ण वाढत आहेत त्यामुळे स्वतंत्र आपत्कालीन वॉर्ड मेडिसीन विभागात सुरू केला जात आहे. औषधी व कर्मचार्यांची कमतरता असल्याने महापालिका व आरोग्य उपसंचालकांकडे मदत मागितली आहे. लवकरच या बाबींची व्यवस्था होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.
























































