वीज कार्यालयासमोर ग्रामस्थांचे आंदोलन, अभियंत्याच्या कार्यालयाला ठोकले टाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, सटाणा

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील लाईची टेकडी या आदिवासी वस्तीवरील रहिवाशांना वारंवार वीज समस्येला सामोरे जावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून पाच ते सहा तास ठिय्या आंदोलन केले.

जायखेडा लाडूद रस्त्यावरील लाईची टेकडी येथे दीडशे ते दोनशे आदिवासी कुटुंबे राहतात. वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. जायखेडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील या वस्तीवर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मिळावे यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतनेही वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे दिरंगाई होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. ग्रामपंचायतीने 1 जानेवारी 2018 रोजी कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांना लाईच्या वस्तीवर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पत्रव्यवहारही केले होते. परंतु आजतागायत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले जाते. वस्तीला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नसल्याने लाडूद शिवारातील रस्त्यालगतच्या कमकुवत डीपीवर परिसरातील शेतकऱ्यांचे विहिरीतील विद्युत पंप व वस्तीला स्ट्रिट लाईट जोडणी केली आहे.

ट्रान्सफॉर्मरच्या क्षेमतेपेक्षा जास्त भार या डीपीवर येत असल्याने वारंवार ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सदर वस्तीवर सतत अंधाराचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील जंगली श्वापदांचा मोठा वावर असल्याने वस्तीवर सहाच्या आत स्मशान शांतता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता नितिन सूर्यवंशी यांनाही निवेदन दिले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

यावेळी एका महिन्यात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासन कधीच हवेत विरल्याचे संतप्त ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अखेरीस संतप्त झालेल्या दीडशेवर आदिवासी बांधब व महिलांनी जायखेडा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले, मात्र कनिष्ठ अभियंता मंगेश सोनगिरे यांची भेट झाली नसल्याने त्यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेवाळे, दोधा गांगुर्डे, वसंत माळी, फुलसिंग पवार, दोधू सोनवणे, शंकर सोनवणे, बाळू गायकवाड, अनिल गायकवाड, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते. तब्बल पाच ते सहा तासांच्या आंदोलनानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी लवकरच ट्रान्सफार्मर बसवून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

summary- villagers strike against electricity problems in satana