सुरेखा राठोड हत्याप्रकरण: फरार दोन आरोपींना पकडण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

किनवट येथील प्राचार्य सुरेखा विजय राठोड प्रकरणातील वादग्रस्त वैशाली माने आणि तिचा नवरा शेषराव माने या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे आणि त्यांच्या पथकाने १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर ताब्यात घेतले आहे. किनवट येथील जनतेने पोलीसांना १७ सप्टेंबरपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करून असा इशारा दिला होता.

२३ ऑगस्टच्या सकाळी ९.३०च्या दरम्यान शिवनगर, गोकुंदा, किनवट येथे प्राचार्य सुरेशा विजय राठोड (३९) या महिलेचा खून झाला. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची तक्रार सुरेखाचा भाऊ विलास जाधव यांनी दिली. विलास जाधव सुद्धा शिक्षक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सुरेखाचा नवरा विजय टोपा राठोड, अशोक टोपा राठोड, वैशाली माने आणि प्रमोद उर्फ अजय थोरात अशी चार जणांची नावे होती.

पोलिसांनी पहिल्याच दिवशी विजय राठोडला अटक केली. प्रमोद उर्फ अजय थोरातला अटक केली. पण इतर आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. किनवटच्या जनतेने, विविध संघटनांनी या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत अटक केली नाही तर रास्ता रोको आणि त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येतील, असा इशारा दिला होता. पोलिसांनी वैशाली मानेला पकडण्यासाठी जंगजंग पछाडले पण त्यांना यश येत नव्हते.

तीन रात्र जागून पोलीस पथकाने केलेल्या मेहनतीला १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर यश आले आणि त्यांनी याप्रकरणातील सर्वात वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेल्या वैशाली माने आणि तिचा नवरा शेषराव माने या दोघांना ताब्यात घेतले. वैशाली मानेने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा यासाठी अर्ज केला होता. पण त्या अर्जाची सुनावणी येण्याअगोदरच पोलीस पथकाच्या मेहनतीला यश आले आणि वैशाली माने आपला नवरा शेषराव मानेसोबत पोलिसांच्या गळाला लागली. या दोघांना किनवट न्यायालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, पोलीस कर्मचारी दत्ता वाणी, अफजल पठाण, देविदास चव्हाण, अमोल सातारे, मंगेश जोंधळे, प्रसाद जाधव, दिनानाथ शिंदे यांनी या वैशाली माने आणि शेषराव मानेला अटक करण्यात मेहनत घेतली.