
सामना ऑनलाईन । पणजी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्यात राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजपने निरीक्षक पाठवून आपल्या आणि घटक पक्षाच्या आमदारांची मते जाणून घेतली आहेत. त्याचवेळी सरकारवरील दबाव वाढवण्यासाठी काँग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यपालांना पत्र पाठवून काँग्रेसने पक्षाला सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची यावी अशी मागणी केली आहे.
2017 च्या निवडणुकीत काँग्रेस 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता. इतर पक्षांचे 10 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप आणि घटक पक्षांची पर्रीकर यांच्या गैरहजेरीत सरकार सुरळीत चालवण्यासाठी धडपड सुरू असताना काँग्रेस विधिमंडळ गटाने आज बैठक घेऊन राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर काँग्रेस आमदारांनी राजभवन गाठून मागण्यांचे निवेदन सादर केले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे गरजेचे होते. सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
राज्यातील आमदारांना जनतेने 5 वर्षांसाठी निवडून दिले असल्याने भाजपने विधानसभा बरखास्त करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यास ती मान्य करू नये अशी विनंतीही काँग्रेस आमदारांनी केली आहे. राज्यपालांनी उद्या भेटीसाठी वेळ द्यावा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये व एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून व त्यांचे म्हणणे जाणून घेऊन भाजपमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा नेता हा भाजपमधूनच निवडला जावा असे वाटते, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण बाहेरून जो नेता येईल, त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावे, असा मुद्दा मांडत आहे.




























































