
सामना प्रतिनिधी । कुडाळ
गणपती बाप्पा मोरया… पुढच्यावर्षी लवकर या.. अशा जयघोषात सोमवारी कुडाळ तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतीं बाप्पांसह गौराईचे मोठ्या थाटात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. दीड, पाच, सात, अकरा, सतरा, एकवीस दिवस असे गणपतीचे घरोघरी पूजन केले जाते.
सोमवारी सायंकाळी तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या बाप्पांसह गौराई देवीचे ही भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीसह तालुक्यात ठिकठिकाणी नदी,तलाव, ओहळ आदी ठिकठिकाणी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. कुडाळ शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत गणपती बाप्पाला निरोप देण्याचा उत्साह सुरू होता.
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने निर्माल्य कलश
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी गणेश भक्तांनी निर्माल्य या कलशामध्ये टाकावे असे आवाहन यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना दिले. कुडाळ भंगसाळ नदीकिनारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मेहनत घेत होते. कुडाळ मध्ये या निर्माल्य कलशात जमा होणार्या निर्माल्याचा पिंगुळी येथे कंपोस्ट खत तयार करून हे खत प्रतिष्ठानच्यावतीने कुडाळ हायस्कूल परिसरात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीला वापरण्यात येणार असल्याचे यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

































































