
सामना ऑनलाईन, ठाणे
ठाण्यात भरदिवसा, भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे हिची हत्या झाल्याच्या घटनेला दीड महिना उलटत नाही तोच मुंब्य्रात या घटनेची पुनरावृत्ती घडली. लग्नाला नकार दिला म्हणून करण हुले या आरोपी माथेफिरूने तरुणीच्या कपाळावर, खांद्यावर, पोटावर सपासप दहा ते बारा वार करून पोबारा केला. सुदैवाने या घटनेत पीडिता बालबाल बचावली असून तिला गंभीर जखमी अवस्थेत कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे हा हल्लेखोर माथेफिरू हा पीडितेचा नातेवाईक असल्याचे उघडकीस आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंब्रा येथील बायपासजकळ जखमी 21 वर्षीय तरुणी राहते. तिचा नातेवाईक असलेला आरोपी करण हुले (25) येथील सम्राटनगर भागात राहतो. रविवारी सायंकाळी जखमी तरुणी घराबाहेर बसलेली असताना करण याने तिथेच तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या करण याने चाकू काढून तिच्या पोटावर, कपाळावर, खांद्यावर, पाठीवर वार केले. यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेत करणने धूम ठोकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तत्काळ कळवा येथील रुग्णालयात हलकण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉ. सुरेश ठाकूर यांनी दिली.
पुन्हा प्राची झाडे
अवघ्या दीड महिन्यापूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गावर आकाश पवार या तरुणाने प्राची झाडे हिच्यावर चाकूने वार केले होते. त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला होता. मुंब्रा येथील या घटनेने प्राची झाडे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केला असून त्याला लवकरच जेरबंद केले जाईल, असे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी सांगितले.


























































