
सामना प्रतिनिधी । मुंबई
नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुजित कुमार याने त्याला पोलीस कोठडीत पट्टय़ाने तसेच काठीने जबर मारहाण केल्याची भर न्यायालयात तक्रार करून एकच खळबळ उडवून दिली. पोलीस कोठडीत झालेल्या मारहाण प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयाने गंभीर दखल घेत सुजित कुमार याला तातडीने जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी सर्वात आधी अटक केलेल्या सुजित कुमार याचा ताबा 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एटीएसकडे मिळाला. त्यावेळी त्याला आजपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची कोठडीची मुदत आज संपणार होती. त्यामुळे आणखी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपीच्या पिंजऱ्यात हजर होताच आरोपी सुजित कुमारने तपास अधिकाऱयांवर आरोप करत त्याला पोलीस कोठडीत जबर मारहाण झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी चामडय़ाच्या पट्टय़ाने तसेच काठीने आपली प्रचंड धुलाई केली, असेही त्याने न्यायालयात सांगितले. त्याच्या या तक्रारीची दखल घेत न्यायाधीशांनी त्याला जे. जे. रुग्णालयात धाडले.
लोधी आणि सूर्यवंशीच्या कोठडीत वाढ
दरम्यान, नालासोपारा येथील शस्त्र्ासाठय़ाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लीलाधर ऊर्फ विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत न्यायाधीशांनी 25 सप्टेंबरपर्यंत वाढ केली.


























































