
सामना प्रतिनिधी । मुंबई
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या सरकारी वीज कंपन्यांवर तब्बल 65 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या व्याजापोटी वर्षाला सहा-सात हजार कोटी रुपये वीज कंपन्यांना मोजावे लागत आहेत. त्याचा भार वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांनी एलआयसीबरोबरच राष्ट्रीय बँकांकडून स्वस्त व्याजदराने कर्ज मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 15 हजार कोटींच्या कर्जाचे चेंजओव्हर करण्यात येणार आहे
महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी वीज वितरण जाळे उभारले आहे. त्याकरिता रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पेरेशन आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून सुमारे 23 हजार 173 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे, तर महानिर्मितीने वीज प्रकल्प उभारण्यासाठी 35 हजार 310 कोटी रुपये तर महापारेषणने वीज वितरण जाळे उभारण्यासाठी 6733 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जावर सरासरी 11 टक्के एवढे व्याज आकारले जात आहे. त्यामुळे व्याजापोटी वीज कंपन्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्याची दखल घेत एमएसईबी या होल्डिंग कंपनीने तिन्ही कंपन्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याच्या कर्जाचा जादा दर कमी होऊन 9 ते 9.30 टक्क्यांपर्यंत खाली आल्यास वार्षिक 500 कोटींहून अधिक रक्कम वाचणार असल्याचे महानिर्मितीच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पहिल्या टप्प्यात 15 हजार कोटींचे चेंज ओव्हर
वीज कंपन्यांवर 65 हजार कोटी रुपयांचे कर्ज असले तरी पहिल्या टप्प्यात 15 हजार कोटी रुपयांचे स्वस्त व्याजदराने कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनकडे संपर्क साधण्यात आला असून जादा व्याजदर असलेल्या कर्जाचा व्याजदर कमी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एलआयसी आणि राष्ट्रीय बँका सरासरी नऊ टक्के दराने दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






























































