
सामना ऑनलाईन, मुंबई
बिहारमधील पाटण्यात एका शाळेच्या मुख्याध्यापकाने पाचवीत शिकणाऱ्या चिमुरडीवर सतत बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही गोष्ट कळाल्यानंतर शाळेतल्याच दुसऱ्या शिक्षकाने मुख्याध्यापकाला ब्लॅकमेल करण्याची धमकी देत त्यानेही या मुलीवर बलात्कार केला. सततच्या या लैंगिक अत्याचारामुळे आता ही मुलगी गर्भवती झाली आहे. ही बाब कळाल्यानंतर मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या मुलीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ती गर्भवती असल्याचं कळालं, त्यांनी तत्काळ मुलीच्या पालकांना ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचं सांगितलं. हादरलेल्या पालकांनी याबाबतची तक्रार करताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करीत आरोपींना अटक केली आहे.

























































