बायको गेल्याने वेडापिसा झाला, थंड करण्यासाठी ग्रामस्थांनी लावून दिलं लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donkey-1

सामना ऑनलाईन । म्हैसूर

पहिली बायको गेल्याने वेडापिसा झालेल्या एकाचं ग्रामस्थांनी दुसरं लग्न लावून दिल्याची घटना म्हैसूरमध्ये घडली आहे. पण, दुसरं लग्न झालेला हा ‘देवदास’ माणूस नसून एक गाढव आहे.

म्हैसूर येथील हुरा या गावातील एका गाढवाने गेल्या काही दिवसांपासून लोकांना लाथा मारून आणि चावून हैराण केलं होतं. पण, हे गाढव आधीपासूनच असं नव्हतं. याआधी शांत असलेल्या या गाढवाची एक जोडीदार होती. मात्र, त्या गाढविणीला बिबट्याने काही काळापूर्वीच मारून टाकलं. त्यानंतर शांत असणारं हे गाढव अस्वस्थ होऊ लागलं आणि लोकांवर हल्ले करू लागलं. ‘बायको’चा विरह असह्य झाल्याने गाढव असं वागत असावं, असा निष्कर्ष हुरावासीयांनी काढला आणि त्याच्यासाठी दुसरी बायको शोधण्याचं निश्चित केलं.

आसपासच्या गावात ‘वधू’संशोधन करत असताना गाढवाची कहाणी ऐकून एका शेतकऱ्याला दया आली. त्याने आपल्याकडे असलेली एक गाढवीण हुरावासीयांना मोफत देऊन टाकली. गाढवाचा जोडीदार विकत घेण्यासाठी गावकऱ्यांनी आधीच वर्गणी गोळा केली होती. पण, शेतकऱ्याने त्याची गाढवीण मोफत दिल्यानंतर गावकऱ्यांनी त्या दोघांचं वाजतगाजत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दोघांनाही नवीन कपडे शिवण्यात आले. एका पुजाऱ्याने त्यांचा विधिवत विवाह लावून दिला. लग्नानंतर गावात मिठाईसुद्धा वाटण्यात आली.

विशेष म्हणजे, लग्नापूर्वी दुगाण्या झाडीत लोकांना चावणारं हे गाढव लग्नादिवशी मात्र चुपचाप होतं. लग्न लागल्यानंतर दोन दिवसात त्याची त्याच्या नवीन बायकोसोबत गट्टी जमल्याचं निरीक्षण ग्रामस्थांनी नोंदवलं आहे. त्यामुळे या नवपरिणित जोडप्याचा संसार सुखाचा होणार असल्याचं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे.

summary- villagers found bride for donkey